भिवंडी - फातमा नगर येथे राहत्या घराच्या खोलीत गांजा साठविण्यात आला असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. यानंतर पोलीसांनी सदर ठिकाणी शुक्रवारी छापा टाकला. या कारवाईत तब्बल 16 लाख 37 हजार 480 रुपये किंमतीचा 75 किलो गांजा जप्त करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे, अशी माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
कमल हसन रजा उर्फ गुड्डू अन्सारी (वय - २४ वर्षे, रा. फातमा नगर), असे गांजा साठवणूक प्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फातमा नगर येथे, राहत्या घराच्या खोलीत अवैध गांजा साठवल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखा युनिट-२ ला मिळाली होती. यानंतर, गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने छापा मारून कमल याच्या राहत्या घरातून ७४.६२४ कि. ग्रॅम, वजनाचा गांजा, रोख रक्कम तसेच मोबाईल फोन, असा एकूण १६ लाख ३७ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सदरचा मुद्देमाल हा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून याप्रकरणी स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीस शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास २२ डिसेंम्बरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सदरची कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, पोलीस उप निरीक्षक शरद बरकडे, पोलीस उप निरीक्षक रमेश शिंगे, सहायक पोलीस उप निरीक्षक रामसिंग चव्हाण, सहायक पोलीस उप निरीक्षक हनुमंत वाघमारे, पोलीस हवालदार राजेंद्र चौधरी, पोलीस हवालदार रामचंद्र जाधव, पोलीस हवालदार अरूण पाटील, पोलीस नाईक साबीर शेख , पोना सचिन जाधव, पोलीस नाईक रंगनाथ पाटील आदींनी केली.