लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (एनसीबी) अधिकाऱ्यांनी ७५ किलो गांजा आणि ४८०० कोडीन बॉटल्स अशा एकूण पावणे दोन कोटी रुपयांच्या अमली पदार्थांच्या तस्करीचा पर्दाफाश केला आहे. ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगर येथे ही कारवाई करण्यात आली असून, याप्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
एका आंतरराज्यीय टोळीच्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती एनसीबीच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या टोळीतील तस्करांनी कुरियरद्वारे अमली पदार्थ मागविल्याची माहितीही अधिकाऱ्यांना मिळाली होती.
एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी सहा तस्करांना जेरबंद करून त्यांच्याकडून ७५ किलो गांजा आणि ४,८०० कोडीन बॉटल्स जप्त केल्या आहेत. अधिकाऱ्यांनी संबंधित कुरियरच्या कार्यालयाबाहेर सापळा रचला होता. काही वेळाने एक व्यक्ती ते पार्सल घेण्यासाठी आली. त्या व्यक्तीने ते पार्सल घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी त्याला घेरले. विनोद पी. असे या व्यक्तीचे नाव आहे. त्याच्या चौकशीत त्याने टोळीतील इतरांची माहिती दिली. त्या अन्य पाच जणांना भिवंडी येथून अटक करण्यात आली. त्यांच्याकडे एक लाख १८ हजार ८६० रुपये आढळले. ते जप्त करण्यात आले आहेत.