औरंगाबाद : रुईच्या गाठी खरेदी केल्यानंतर ठरल्याप्रमाणे रक्कम न देता गंगापूरचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांच्या कंपनीला ७६ लाख ५६ हजार ५४५ रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी नवमहाराष्ट्र सहकारी सूतगिरणी (कल्लापाण्णावाडी, मु. सांजणी, ता. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) संचालक मंडळाविरोधात पोलिसांनी वेदांतनगर ठाण्यात सोमवारी गुन्हा नोंदविला.
संस्थेचे अध्यक्ष पी. एम. मालगावे, संचालक राहुल प्रकाश आवाडे, चंद्रकांत दत्तात्रय इगवले, आनंदा नायकू नेमिटे, जाधवजी मनजी, प्रकाश बापू मोरे, गजानन शंकरराव बीडकर, अतुल तुकाराम बुगड, अभय ऊर्फ राजू अप्पासाहेब मगदूम, तात्यासाहेब दत्तात्रय कुंभोजे, मधुकर देवबाप्पा मनेर, सुभाषराव राजाराम ससे, बाळासाहेब वाल्मीक माने, राजू वसंत सुतार, प्रणव हरिहर होगाडे आणि कार्यकारी संचालक दीपक अण्णासाहेब पाटील, अशी आरोपींची नावे आहेत. सहायक पोलीस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे म्हणाले की, अण्णासाहेब माने आणि शरद गांधी यांची जाखमाथावाडी (ता. गंगापूर) येथे किसान अॅग्रो इंडस्ट्रीज सूतगिरणी आहे.
२०११ पासून आरोपीची सूतगिरणी ही तक्रारदार यांच्या सूतगिरणीकडून रुई गाठी खरेदी करतात. २०१५-१६ मध्ये आरोपींनी खरेदी केलेल्या गाठीचे ७५ लाख २९ हजार ३०९ रुपये वेळेवर दिले नव्हते. तेव्हा सूतगिरणीचे कार्यकारी संचालक दीपक पाटील यांनी गाठीचे ७५ लाख रुपये त्यांच्या सहकारी पतसंस्थेत एक वर्ष डिपॉझिट म्हणून ठेवल्यास १८ टक्के दराने व्याजासह मूळ रक्कम परत केल्या जाईल असे सांगितले होते. त्यानुसार ती रक्कम एक वर्ष आरोपींच्या सांगण्यानुसार पतसंस्थेत ठेवण्यात आली. दुसऱ्या वर्षी तक्रारदार यांच्या सूतगिरणीने आरोपींना १ कोटी ५० लाख २७ हजार २३६ रुपयांचा माल पाठविला. यापैकी आरोपींनी त्यांना १ कोटी ४९ लाख रुपये दिले. उर्वरित १ लाख २७ हजार २३६ बाकी ठेवले होते.
बंद खात्याचे दिले धनादेशपैशासाठी तगादा लागताच आरोपींनी फसवणूक करण्याच्या उद्देशाने तक्रारदार यांना बंद बँक खात्याचे धनादेश दिले. आरोपींनी कंपनीची जाणीवपूर्वक फसवणूक आणि विश्वासघात केल्याचे लक्षात येताच गांधी यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदविली.