मुंबई: सीएम चषक या क्रीडा आणि सांस्कृतिक स्पर्धेदरम्यान अनिता शर्मा (वय 12 वर्ष) नावाच्या मुलीचा मृत्यू झाला. सगळ्यांच्या देखत कांदिवलीत स्टेजवर हा प्रकार घडला. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप उघड झालेले नसून याप्रकरणी कांदिवली पोलीस अधीक चौकशी करत आहेत. शर्मा ही कांदिवलीच्या गोविंद नगर परिसरातच राहत असून हिलडा आंटी शाळेत इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत होती. तिला तीन बहिणी असून वडील सलोनमध्ये काम करतात. शाळेतून काही विद्यार्थिनीना सीएम चषकमार्फत आयोजित करण्यात आलेल्या नृत्य स्पर्धेत सहभागी करण्यात आले होते.
प्रत्यक्षदर्शी संजय सिंग यांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, शर्मा ही नृत्य करण्यासाठी स्टेजवर गेली. तिथे गेल्यावर झोपून करण्याची एक स्टेप करण्याचा प्रयत्न करताना ती जवळपास एक मिनिट उठलीच नाही. सुरुवातीला आम्हाला तो नृत्याचा एक भाग वाटला. मात्र नंतर आम्ही सर्वांनी तिच्याकडे धाव घेतली. तेव्हा तिचे संपूर्ण शरीर आखडी आल्याप्रमाणे ताठ झाले होते. त्यामुळे आम्ही तिला जवळच्या ट्रायडेंट या खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरने तिला तपासून मृत घोषित केले. त्यामुळे त्याठिकाणी हजर असलेल्या सर्वांनाच धक्का बसला.'मुलगी आमच्याकडे आली त्या आधीच तिचा मृत्यू झाला होता. त्यामुळे तिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी आम्ही कांदिवलीच्या शताब्दी रुग्णालयात पाठविला आहे, असे ट्रायडेंट हॉस्पिटलचे डॉक्टर अनिल यादव यांनी सांगितले. याप्रकरणी कांदिवली पोलीस चौकशी करत आहेत.
'माझी मुलगी दहा तास होती उपाशी' !स्पर्धा सकाळी 7 वाजता सुरू होणार असल्याचे आम्हाला सांगण्यात आले. मात्र नंतर ती 10 वाजता आणि नंतर 12 वाजता सुरू करणार असे आयोजकांनी सांगितले. अखेर संध्याकाळी 5 वाजण्याच्या सुमारास ती सुरू करण्यात आली कारण प्रमुख पाहुणे कार्यक्रमात पोहोचले नव्हते. सकाळी अनिता काही खाऊन गेली नव्हती तसेच ती दिवसभर उन्हात उपाशी उभी होती. तिला कसलाही त्रास नव्हता त्यामुळे तिच्या मृत्यूची योग्य ती चौकशी करुन याप्रकरणी दोषींना कडक शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मृत मुलीचे वडील भरत शर्मा यांनी केली आहे.
स्कुटरवरून मुलीला नेले रुग्णालयात !'कांदिवली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात रुग्णवाहिकेची सोय नव्हती. त्यामुळे अनिता बेशुद्ध पडल्यानंतर तिला चक्क स्कुटरवरुन रुग्णालयात नेण्यात आले. माझ्या भावाच्या मुलामुळे हा प्रकार आम्हाला समजला आणि मी रुग्णालयात सहाच्या दरम्यान पोहोचलो. तेव्हा माझ्या मुलीचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरने सांगितले. आल्याने तिच्या नातेवाईकांकडुन संताप व्यक्त केला जात आहे.
हा निव्वळ अपघात !'मुलगी स्टेजवर परफॉर्मन्स करण्याआधीच कोसळली. तिला रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले त्यामुळे हा निव्वळ अपघात आहे. यात कोणाचाही निष्काळजीपणा नाही. मुलांसाठी खाण्यापिण्याची सोय करण्यात आली होती', असे नगरसेवक कमलेश यादव यांनी सांगितले.