मंगेश कराळे
नालासोपारा :- मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक करून ८ गुन्हयांची उकल करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून पोलिसांनी चोरी केलेले १२ मोबाईल हस्तगत केल्याची माहिती पत्रकार परिषदेत पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे यांनी गुरुवारी दिली आहे.
गोखिवरेच्या बंजारापाडा परिसरात राहणारे गोविंद कनीराम पवार (४५) यांचे राहते घरी २३ जुलैला मोबाईल चोरून नेले होते. याप्रकरणी वालीव पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. पोलीस आयुक्तालयात सतत होणा-या मोबाईल चोरींचे प्रमाण वाढत असल्याने मोबाईल चोऱ्यांवर आळा घालण्यासाठी वरिष्ठांनी आदेश केले होते. त्या अनुषंगाने घडणाऱ्या प्रत्येक मोबाईल चोरीच्या गुन्हयाचे ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून चोरीस गेलेले मोबाईल हे सतत सायबर सेल मार्फत सर्वेक्षणावर ठेवून गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या मार्फतीने गुन्हयातील आरोपीचा शोध घेण्यात येत होता.
मिळालेल्या बातमीनुसार व मोबाईलचे तांत्रिक विश्लेषणाव्दारे वालीवच्या मोबाईल चोरीच्या गुन्हयांतील आरोपीच्या नावाची उकल करुन जाकिर अली मेहबुब अली शेख उर्फ कालीया याला आशा नगर, मुंबई अहमदाबाद महामार्गाचे शेजारील झोपडपट्टीतून ताब्यात घेतले. आरोपीचा गुन्हातील सहभाग निष्प्पन्न झाल्याने त्याला पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केल्यावर आयुक्तालयातील वालीव पोलीस ठाण्यातील घरफोडीचे ४ गुन्हे तसेच मोबाईल चोरीचे ४ असे एकुण ८ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक आरोपीकडून उघडकीस आणलेल्या घरफोडी व मोबाईल चोरीच्या ८ गुन्हयात एकुण १ लाख ४९ हजार रुपये किंमतीचे १२ मोबाईल असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अटक आरोपी विरुध्द मेघवाडी, पवई, साकिनाका, धारावी, तुळींज, नवघर याठिकाणी ८ गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त (गुन्हे) अविनाश अंबुरे, सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल मांडवे यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक शाहुराज रणवरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुहास कांबळे, सागर शिंदे, सहाय्यक फौजदार संजय नवले, रमेश भोसले, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, चंदन मोरे, सचिन पाटील, जगदीश गोवारी, रमेश आलदर, सुधीर नरळे, दादा आडके, प्रशांतकुमार ठाकुर, अमोल कोरे, सायबर शाखेचे संतोष चव्हाण, म.सु.ब. अविनाश चौधरी, रामेश्वर केकान यांनी केली आहे.