लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान मध्ये २२ दिवस थांबून पथकाने गुगल वरून स्वीटस शॉपच्या नावाने बनावट वेबसाईट द्वारे फसवणूक करणाऱ्या टोळीला अटक केली आहे. गावदेवी पोलीस ठाण्यातील ८ गुन्ह्याची उकल करण्यात पथकाला यश आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील एका सुप्रसिद्ध स्वीटस शॉपच्या नावाने बनावट वेबसाइट तयार करून त्याद्वारे सामान्य नागरिकांना मिठाई घरपोच देण्याचा बहाणा करून लाखो रुपये उकळणाऱ्या टोळी विरुद्ध गावदेवी पोलीस ठाण्यात ८ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्हयांच्या तांत्रीक माहितीच्या आधारे स्पेशल सायबर सेल झोन २ मधील सपोनि शिंदे यांनी संबंधित स्वीट शॉपची बनावट वेबसाइट तयार करण्या-या राहुल डोगरा याची माहीती मिळवली. आरोपी हा त्याचे राहण्याचे ठिकाण वारंवार बदलत असताना, गोपनिय व तांत्रिक माहितीच्या आधारे सापळा रचून त्याला आग्रा उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेतले. त्याच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
राहुल डोगरा याला अटक करून ट्रांझिट रिमांड व्दारे मुंबई आणले. सायबर गुन्हयातील आरोपी हे अधिकृत वेबसाईट सारख्या बनावट वेबसाईट तयार करून सर्च इंजिनला अधिकृत वेबसाईटच्या आधी बनावट वेबसाईट दिसतील याप्रकारे कोडींग करतात. त्यामुळे कोणीही सर्च केल्यास त्यांची वेब साईट आधी नजरेत पडते. आरोपीने तयार केलेली वेबसाईट हटवत त्याला गुन्ह्यात अटक करण्यात आली. त्यापाठोपाठ अन्य गुन्ह्यातील आरोपीला ग्वाल्हेर येथून अटक करण्यात आली आहे.
गुगलची अशीही गुगली...
गुगलवरील तपशील अचूक असावे यासाठी गुगलने सजेस्ट अॅन एडीट हा पर्याय दिला. त्याद्वारे तपशील बदलता येतो. ऑनलाईन ठगांनी हा पर्याय वापरून बँकांसह शासकीय, खासगी आस्थापना, हॉस्पिटल, हॉटेलसह विविध शॉपिंग संकेतस्थळावरील अधिकृत संपर्क क्रमांक खोडून स्वत:चा मोबाईल क्रमांक गुगलवर देण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे समोरून बोलणारी व्यक्ती बँक, ग्राहक सेवा केंद्रातील अधिकारी असे भासवून वापरकर्त्यांशी संवाद साधून फसवणूक करते.