उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खीरीचे खासदार आणि गृह राज्य मंत्री अजय मिश्र टेनी यांचा मुलगा मोनू मिश्रा याने शेतकऱ्यांवर गाडी चढविल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. यानंतर उसळलेल्या राड्यामध्ये आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू झाला असून मंत्री टेनी यांनी आपला मुलगा तिथे उपस्थित नव्हता असे सांगितले आहे. (eight dead after Union minister's son allegedly runs car over protesting farmers in UP's Lakhimpur Kheri)
उप मुख्यमंत्री केशव मोर्य यांना काळे झेंडे दाखविण्यासाठी शेतकरी तिकोनिया येथे जमले होते. त्यांच्यावर गाडी आदळण्यात आली आहे. मोर्य हे टेनी यांच्या मुळ गावी योजनांच्या उद्घाटनासाठी जात होते. यावेळी आंदोलक शेतकऱ्यांवर गाडी चढविण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला होता. संतप्त शेतकऱ्यांनी टेनी यांच्या मुलाच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांच्या तीन गाड्या पेटवून दिल्या होत्या.
हे प्रकरण आता तापले असून योगी आदित्यनाथांनी आपले दौरे रद्द केले आहेत. तसेच आरपीएच्या तीन तुकड्या तिकडे पाठविल्या आहेत. टेनी यांनी एएनआयला सांगितले की, भाजपाचे कार्यकर्ते आंदोलक शेतकऱ्यांशी बोलण्यासाठी गेले होते. तेव्हा शेतकऱ्यांतील काही समाजंटकांनी कार्यकर्त्यांवर दगडफेक केली. यामुळे कार चालविणाऱ्या चालकाला दुखापत झाली. यामुळे कारवरील नियंत्रण सुटले आणि दोन जण कारखाली आल्याने मृत झाले. यानंतर आमच्या तीन कार्यकर्त्यांचा देखील मृत्यू झाला. कारना देखील आग लावण्यात आली. (Lakhimpur Kheri: 'My Driver, 3 BJP Workers Were Killed. It’s a Conspiracy', Says MoS Home Ajay Mishra)
माझा मुलगा तिथे उपस्थित नव्हता. तो तिथे असता तर जिवंत परत आला नसता. हल्लेखोरांकडे काठ्या, तलवारी होत्या. त्यांनी लोकांना ठार मारले. आमच्याकडे व्हिडीओ आहेत, असा आरोप मंत्री अजय मिश्र टेनी यांनी केला.
दरम्यान, शेतकऱी संघटनेचे नेते राकेश टिकैत हे दिल्लीच्या वेशीवर सुरु असलेले आंदोलन सोडून लखीमपूरला निघाले आहेत. काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी देखील उद्या तिथे जाणार आहेत. तसेच सपाचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी आता भाजपा कार्यकर्ते फिरू शकणार नाहीत असा इशारा दिला आहे. यामुळे उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर तेथील वातावरण तापले आहे.