ठाणे : घरफोडी करणाऱ्या शहजाद अन्सारी (४०, रा. शिवाजीनगर, मुंबई) याच्यासह आठ अट्टल चोरटयांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकच्या पथकाने अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सोमवारी दिली. त्यांच्याकडून पाच लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून त्यांच्याकडून चोरीचे सात गुन्हे उघड झाले आहेत.
ठाण्यातील बाजारपेठ भागातील एका चोरीप्रकरणी २२ मे २०२२ रोजी अज्ञात चोरटयाविरुद्ध ठाणे नगर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याच गुन्हयाचा समांतर तपास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडून सुरु होता. त्याचवेळी यातील संशयित आरोपींची माहिती एका खबºयाकडून गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली. त्याच आधारे शहजाद अन्सारीसह मोहम्मद नसीम शेख (२३, गोवंडी, मुंबई, ), सद्दाम हुसेन शेख (१९, रा. गोवंडी, मुंबई, ) आणि मोहम्मद निहाल शेख (३२, रा. गोवंडी, मुंबई) यांना २३ सप्टेंबर रोजी अटक करण्यात आली. त्यांना ३ आॅक्टोंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती. याच काळात त्यांच्याकडून चोरीतील तीन लाख ८५ हजारांचे ७७ ग्रॅम सोन्याचे दागीने तसेच मोबाईल हस्तगत् केला आहे. त्यांच्याकडून वर्तकनगर, मुंब्रा, कोपरी आणि कासारवडवली येथील चार गुन्हे उघड झाले असून त्यातील एक लाख ४५ हजारांचे दागिने हस्तगत केले आहेत. तर मुंब्रा येथील चोरीप्रकरणी विनोद गौतम आणि मुसेफ कुरेशी या दोघांना भिवंडीतून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीतील १५ हजारांचा मोबाईल हस्तगत केला आहे. याशिवाय, ठाणेनगर पोलीस ठाण्याच्या चोरी प्रकरणातील सूरज यादव आणि बाबा उर्फ वेल्ली रॉड्री यांना अटक करुन त्यांच्याकडून १३ हजारांचे दोन फोन हस्तगत केले आहेत.