वसई - एकीकडे मिरा भाईंदर वसई विरारपोलिस आयुक्तांलय हद्दीतील विविध प्रकारचे गुन्हे व त्यांच्या आकडेवारीचा अभ्यासपूर्ण वार्षिक लेखाजोखा पोलिस आयुक्त डॉ सदानंद दाते यांनी सोमवारी सर्व प्रसार माध्यमांच्या समोर मांडला असताना दुसरीकडे मात्र, अज्ञात चोरट्यांनी वसई परिमंडळ -२ मध्ये दिवसाढवळ्या एका गृहनिर्माण संकुलात आठ लाखांची घरफोडी करीत सन २०२२ या वर्षासाठीच्या आगामी अहवालात गुन्ह्याची नोंद केली आहे. दरम्यान वसईत चक्क आठ लाखांची घरफोडी करून अज्ञात चोरटे फरार झाल्याची घटना मंगळवारी सायंकाळी ७ च्या सुमारास उघडकीस आली आहे.
या प्रकरणी अज्ञात चोरट्यां विरोधात माणिकपूर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांच्या तपासासाठी एक स्वतंत्र पथक देखील नियुक्त करण्यात आल्याचे माणिकपूर पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अंबाडी रोड येथील दिवाण गार्डन सोसायटीमध्ये रविवार ( दि.२३ ) जानेवारी रोजी प्लॅट क्रं. सी/७२ यांच्या घरात कोणीही नसताना अज्ञात चोरट्यांनी मुख्यदाराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला आणि सर्व किंमती ऐवज लंपास केला तर संध्याकाळी घरातील सर्व मंडळी घरी परतल्यावर हा सर्व चोरी झाल्याचा प्रकार उघडकीस आला.
या सर्व घटनेत चोरट्यांनी घरातील सर्व किमती वस्तू आणि कपाट व त्यातील रु. ८ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी झाल्याचे पीडित कुटूंबाला समजले आणि त्यांनी माणिकपूर पोलिसांत तक्रार दाखल केली.
दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेत एकूण आठ लाखांची घरफोडी करून हे अज्ञात चोरटे फरार होण्यास यशस्वी झाले असून या घरफोडीच्या घटनेने मात्र पुन्हा एकदा माणिकपूर पोलिसांसमोर चोरट्यांनी मोठं आव्हान उभे केले आहे