उल्हासनगर - स्वामी डामाराम दरबाराच्या (मंदिर) पुजारी जॅकी जग्याशी यांच्या घरी ३० ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजता सशस्त्र दरोडा पडून १० लाख ८० ऐवज लंपास केला. शहर गुन्हे अन्वेषण विभागासह विठ्ठलवाडी पोलिसांनी आतापर्यंत ८ जणांना अटक करून त्यांच्याकडून दोन रिक्षा, कार, मोटरसायकल व सोन्याची लगड जप्त केली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीराम चौकात स्वामी डामाराम दरबार (मंदिर) असून मंदिराचे पुजारी जॅकी जग्याशी हे कुटुंबासह मंदिर शेजारी राहतात. ३० ऑगस्ट रोजी सकाळी ५ वाजता ईको कार मधून आलेल्या सशस्त्र टोळीने जग्याशी यांच्या घरी दरोडा टाकून ८० हजार रोख रक्कमेसह सोन्या चांदीचे दागिने असे एकून १० लाख ८० हजाराचा ऐवज लंपास केला. दरोड्याने एकच खळबळ उडवून पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते, सहायक पोलिस आयुक्त मोतीचंद राठोड, विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय गायकवाड, गुन्हे अन्वेषण विभागाचे अनिल मांगले आदींनी पथके स्थापन करून दरोडेखोरांची शोध मोहीम सुरू केली.
शहर गुन्हे अन्वेषण विभाग व विट्ठलवाडी पोलिसांनी सुरवातीला अकबर इमान खान, आसिफ वासिम अली, शिवसिंग विरसिंग शिकलकर व राहुलसिंग बबलुसिंग जुनी या चार जणांना अटक केली. तर दोन दिवसांनी विठ्ठलवाडी पोलिसांनी अनिलसिंग गुलाबीसींग दुधानी, शिवा बाबू निंबाळकर, सुनील उर्फ मुसा शिवाप्पा कुरणे व राजकुमार शिवाप्पा कुरणे यांना अटक केली. यांच्याकडून पोलिसांनी ७८ ग्राम सोन्याचे लगड, ईको कार, महिंद्रा कार, दोन रिक्षा, मोटरसायकल, चाकू असे साहित्य जप्त केले. यातील अनिलसिंग दुधानी, शिवसिंग शिकलकर अकबर खान, आसिफ शेख, राहुलसिंग जुनी, शिवा निंबाळकर यांच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात जबरी चोरी, दरोड्याचा तयारी, असे एकून १८ गुन्हे दाखल आहेत. न्यायालयाने त्यांना १४ सप्टेंबर पर्यंत पोलीस कस्टडी देण्यात आली असून अधिक गुन्हे उघड होण्याची शक्यता वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी व्यक्त केली.