पुणे : जुन्नर येथील निमगिरीमधील ८० वर्षाच्या जिजाबाई अंबु भांगरे यांच्या खुनाचे रहस्य उलघडण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला यश आले आहे़. पैसे चोरताना जिजाबाई भांगरे यांनी पाहिल्याने त्यांच्याच नातेवाईकांने खुन केल्याचे उघड झाले आहे़. घटनेच्या ठिकाणी भांड्यामध्ये भात शिजवण्याकरीता ठेवलेला होता़. या धाग्यावरुन पोलीस आरोपीपर्यंत पोहचले़. सुनिल लिंबा मेमाणे (वय २७, रा़ चावंड, ता़ जुन्नर) असे अटक केलेल्याचे नाव आहे़. तर, जिजाबाई अंबु भांगरे (वय ८०, रा़ साकिरवाडी, ता़ अकोले, जि नगर, मुळ निमगिरी, खांडेची वाडी, ता़ जुन्नर) असे खुन झालेल्या महिलेचे नाव आहे़ निमगिरी गावातील खांडेची वाडी येथे २१ नोव्हेबरला दुपारी २ वाजता महिलेचा दोरीने गळा आवळून तिला लाकडी खांबाला दोरीच्या सहाय्याने लटकावून तिचा खुन केल्याचे समोर आले़. याप्रकरणी किसन बारकु साबळे यांनी जुन्नर पोलिसांकडे फिर्याद दिली़. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असल्याने विशेष पोलीस महानिरीक्षक सुहास वारके यांनी पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी दिपाली खन्ना यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या़. त्यानुसार संदीप पाटील यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट यांना समांतर तपास करण्याचा आदेश दिला होता़. जिजाबाई या भाचा किसन साबळे व त्याच्या पत्नीसह खांडेची वाडी या छोट्या गावात राहतात़. किसन व त्याची पत्नी भात कापण्यासाठी गेले होते़. सायंकाळीपर्यंत आल्यावर त्यांना जिजाबाई यांचा मृतदेह लाकडी तुळईला लटकत असल्याचे दिसून आले़. शवविच्छेदनात त्यांचा गळा दाबून खुन केल्यावर ती आत्महत्या असल्याचे भासविण्यासाठी गळफास घेतल्याचा बहाणा करण्यात आल्याचे स्पष्ट झाले़ घरातील व जिजाबाई यांच्या अंगावरील ६ हजार ५५० रुपयांचे दागिने चोरीला गेले होते़.पोलिसांनी घटनास्थळाला भेट दिली़. तेव्हा त्या ठिकाणी भांड्यामध्ये भात शिजविण्याकरीता ठेवलेला असल्याचे दिसून आले होते़. त्यावरुन जिजाबाई भांगरे यांनी त्यांच्या ओळखीच्याच कोणासाठी तरी हा भात ठेवलेला असावा, असा संशय पोलिसांना आला़. या धाग्यावरुन पोलिसांनी सुनिल मेमाणे याला ताब्यात घेतले़. त्याने आपणच खुन केल्याची कबुली दिली़. पूर्वी जिजाबाईच्या शेजारी सुनिल मेमाणे रहात होता़. तो २१ नोव्हेंबरला घरी आला होता़. तेव्हा जिजाबाई एकट्याच घरात होत्या़. त्यांनी त्याच्यासाठी भात शिजविण्यास ठेवला व त्याला बसायला सांगून त्या बाहेर भांडी घासण्यासाठी गेल्या होत्या़. पैशाची अडचण असल्याने ही संधी साधून सुनिल मेमाणे याने घरातील कपाटात उचकपाचक सुरु केली़. त्याचवेळी जिजाबाई या घरात आल्या़ घाबरलेल्या सुनिलने त्यांचा गळा दाबून त्यांचा खुन केला़. ही कामगिरी पोलीस निरीक्षक पदमाकर घनवट सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, हवालदार सुनिल जावळे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, दीपक साबळे, गुरु जाधव, नितीन भोर, अक्षय नवले, समाधान नाईकनवरे यांच्या पथकाने केली आहे़.
८० वर्षाच्या महिलेच्या खुनाचे रहस्य उलघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 3:45 PM