कोरबा – आजपर्यंत आपण अनेक चोरीच्या घटना ऐकल्या असतील. कोणाच्या घरातील किंमती वस्तू, रोकड चोरीला गेलीय तर कुणाची गाडी चोरली अशा विविध तक्रारी पोलीस स्टेशनला येत असतात. रेल्वेत खिसा कापणे हे पण काही नवीन नाही. पण तुम्ही कधी ऐकलंय का गाईचं शेण चोरीला गेले आहे. आश्चर्य आहे ना..पण छत्तीसगडच्या कोरबा जिल्ह्यात शेण चोरीला गेल्याची अजब घटना समोर आली आहे.
छत्तीसगड पोलिसांना कोरबा येथील एका गावातून ८०० किलो शेण चोरीला गेल्याची तक्रार मिळाली. पोलिसांनी या घटनेची नोंद घेत तात्काळ तक्रार नोंदवत याचा तपासही सुरू केला आहे. छत्तीसगड पोलिसांतील एका अधिकाऱ्याने सांगितले की, ८-९ जूनच्या मध्यरात्री दिपका ठाणे परिसरातील धुरेना गावात गाईचं ८०० किलो शेण चोरीला गेले. त्याची किंमत जवळपास १६०० रुपये इतकी आहे. गावातील गोधन ग्राम समितीचे अध्यक्ष कमहान सिंह कंवर यांनी १५ जूनला या घटनेची अधिकृतपणे तक्रार नोंदवली असं अधिकारी हरीश तांडेकर यांनी सांगितले.
कमहार सिंह कंवर यांनी तक्रारीत म्हटलंय की, शेण चोरीच्या प्रकरणात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध घ्यावा. पोलिसांनी या प्रकरणी पीडितांचे जबाब नोंदवले आहेत. आसपासच्या गावांनाही सतर्क करण्यात आलं असून चोरीच्या घटनेची माहिती देण्यात आली आहे. छत्तीसगड सरकारने कृषी खाद्य उत्पादनासाठी गोधन न्याय योजना आणली आहे. त्या अंतर्गत गाईच्या शेणासाठी २ रुपये किलो यादराने हे शेण खरेदी केले जाते.
काय आहे गोधन न्याय योजना?
छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल म्हणाले होते की, वर्मीपोस्टच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणात गाईच्या शेणाचा वापर केला जातो. कृषी उत्पादनातील व्यवसाय वाढवण्यासाठी ही योजना आखण्यात आली. जुलै २०२० मध्ये गोधन न्याय योजनेची सुरुवात झाली. या योजनेत सरकार गावकऱ्यांकडून २ रुपये प्रतिकिलो या दराने गाईचं शेण विकत घेते. खरेदी केलेल्या शेणापासून कम्पोस्ट बनवलं जातं. ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना कमी दरात जैविक खत उपलब्ध करून दिलं जातं.