एस. पी. सिन्हा लोकमत न्यूज नेटवर्करांची : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडमधील निलंबित सनदी अधिकारी (आयएएस) पूजा सिंघल यांचे रुग्णालय आणि डायग्नोस्टिक सेंटरसह ८२.७७ कोटी रुपयांची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. खुंटी जिल्ह्याच्या मनरेगा निधीतील कथित अपहार व अन्य काही संशयित आर्थिक देवाणघेवाणीशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. ईडीने या प्रकरणी यापूर्वी त्यांना अटक केली होती. त्या सध्या कारागृहात आहेत.
जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह पल्स डायग्नोस्टिक ॲन्ड इमेजिंग सेंटरसह संजीवनी नावाने खरेदी करण्यात आलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. पल्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल व पल्स डायग्नोस्टिक सेंटरचा कारभार त्यांचे पती अभिषेक झा पाहतात. याशिवाय जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेत रांची येथील दोन भूखंडांचा समावेश आहे. मनरेगा घोटाळ्याचे प्रकरण झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील आहे. पूजा सिंघल १६ फेब्रुवारी २००९ पासून १९ जुलै २०१० पर्यंत खुंटीच्या उपायुक्त होत्या. त्यावेळी तेथे १८ लाखांचा घोटाळा झाला होता. मनरेगा अंतर्गत काम न करता पैसे काढण्यात आले होते.