मुंबई: हिरे व्यापाऱ्यांना अधिक नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अवघ्या ४ महिन्यात जवळपास ८ कोटी ६८ लाख ७१ हजार ६९१ रुपयांचा चुना लावण्याचा प्रकार वांद्रे परिसरात घडला. याविरोधात बीकेसी पोलिसांनी ब्रोकर मेहुल झवेरी (४५) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
तक्रारदार आनंद शाह (४७) यांचा हिरे खरेदी विक्रीचा व्यवसाय असून भारत डायमंड बोर्समध्ये त्यांचे कार्यालय आहे. ते आरोपी मेहुल याला २०१० सालापासून ओळखतात. शाह यांनी मेहुल सोबत आधी हिरे विक्रीचा व्यवहार केल्याने त्यांचा त्याच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या तक्रारीनुसार १६ जानेवारीला मेहुल याने त्याच्याकडे हिरे खरेदी करणारा चांगला ग्राहक असून त्याला हिऱ्यांची गरज आहे असे शहा यांना सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून जांगड पावतीवर शहा यांनी त्याला वेगवेगळ्या कॅरेटचे महागडे हिरे दिले. हे हिरे त्याचा सहकारी दिनेश भालसे उर्फ जय स्वीकारेल असेही त्याने सांगितले. तसेच हिरे स्वीकारल्याचे तसेच त्याचे पैसे दहा दिवसात आणून देण्याचे मेहुलने शाह यांना फोन वर कळविले. मात्र त्याने पुन्हा हिऱ्यांची मागणी केली तेव्हा आधीचे व्यवहार पूर्ण झाल्यावर पुढील व्यवहार करेल असे शहा यांनी सांगत हिरे द्यायला नकार दिला.
मेहुलने देखील त्यांना सदर हिरे आय जी आय प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी पाठवल्याचे सांगितले. त्यानंतर ३० जानेवारी रोजी शाह यांनी मेहुलला संपर्क केला तेव्हा तो त्याच्या भारत डायमंड बोर्स येथील कार्यालयात येत असल्याचे म्हणाला. मात्र संध्याकाळी फोन केल्यावर त्याचा फोन बंद आढळला. शाह यांनी अखेर हिरे मार्केटमध्ये त्यांच्या परिचयाच्या हिरे व्यापाऱ्यांना याबाबत विचारणा केली. तेव्हा मेहुलने अन्य काही कंपनीच्या लोकांनाही अशाच प्रकारे चुना लावल्याचे उघड झाले. या सर्व हिरे व्यापाऱ्यांना मिळून त्याने ८ कोटी ६८ लाख ७१ हजार ६९१ रुपयांचा चुना लावल्याचे उघड झाल्यावर शहा यांनी मेहुल विरोधात बीकेसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आणि गुन्हा दाखल करण्यात आला.