लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : कोविड काळात स्थलांतरितांना देण्यात आलेल्या खिचडी वाटपात घोटाळा झाल्याच्या आरोपांप्रकरणी अटकेत असलेले व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय मानले जाणाऱ्या सूरज चव्हाण याची ८८ लाख रुपयांची मालमत्ता ‘ईडी’ने शनिवारी जप्त केली. जप्त केलेल्या मालमत्तेत मुंबईतील फ्लॅट व रत्नागिरी जिल्ह्यातील भूखंडाचा समावेश आहे.
कोविडकाळात महापालिकेतर्फे खिचडी वाटपाचे कंत्राट फोर्स वन मल्टिसर्व्हिसेस या कंपनीला प्राप्त झाले. हे काम संबंधित कंपनीला प्राप्त करून देण्यामध्ये सूरजचा मोठा वाटा होता. कंपनीला हे कंत्राट मिळवून देताना निर्धारित निकषांचे उल्लंघन झाल्याचाही ठपका आहे. याप्रकरणी सूरजला १ कोटी ३५ लाख रुपये मिळाल्याचा आरोप आहे.
प्रकरण काय?
या खिचडी प्रकरणातील कंत्राटाच्या अटीनुसार १५ एप्रिल २०२० पासून संबंधित कंपनीने ३०० ग्रॅम वजनाचे खिचडीचे पाकीट वितरित करणे अपेक्षित होते. याकरिता प्रति पॅकेट ३३ रुपये किंमत निश्चित करण्यात आली होती. या प्रकरणात सूरज चव्हाण याला मिळालेल्या पैशांतून त्यांनी फ्लॅट व भूखंडाची खरेदी केल्याचा ठपका तपास यंत्रणांनी ठेवला असून, त्यामुळेच ही जप्ती करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबईतील आग्रीपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता, तसेच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने देखील या प्रकरणाचा तपास केला होता. पोलिसांनी दाखल केलेल्या याच गुन्ह्याच्या आधारे ‘ईडी’ या प्रकरणाचा तपास करत आहे.