नवी मुंबई - परिमंडळ उपआयुक्तांच्या विशेष पथकाने वाशीतून 89 किलो गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी एकाला अटक केली असून तो गोवंडीचा राहणारा आहे. त्याच्याकडून नवी मुंबई परिसरातील छोटय़ा गांजा विक्रेत्यांना पुरवठा केला जात होता.
वाशी गाव परिसरात एकजन गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरिक्षक जी. डी. देवडे यांना मिळाली होती. त्यानुसार उपआयुक्त पंकज डहाणो, सहायक आयुक्त सतिश गोवेकर यांच्या मार्गदर्शनाखाली देवडे यांच्या पथकाने रविवारी रात्री सापळा रचला होता. यावेळी संशयास्पदरित्या वावरणारया एकाला ताब्यात घेण्यात आले होते. चौकशीत त्याचे नाव मोहम्मद इम्रान सादिक अली शहा (23) असल्याचे सांगितले. त्याच्या अंग झडतीमध्ये एक किलो गांजा आढळून आला. याप्रकरणी त्याला अटक केली असता, चौकशीत त्याने वाशीत मोठय़ा प्रमाणात गांजाचा साठा केल्याचे कबुल केले. यानुसार पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकून त्याठिकाणावरुन 88 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानुसार त्याच्याकडून सुमारे 1 लाख 76 हजार 250 रुपये किमतीचा 89 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी त्याच्याविरोधात वाशी पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई परिसरात गांजा विक्री करणारया छोटय़ा मोठय़ा विक्रेत्यांना तो गांजा पुरवत होता. याकरिता त्याने भाडोत्री जागेमध्ये गांजाचा साठा केला होता. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.