लोकमत न्यूज नेटवर्क, कल्याण: ‘पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडविल्याने मी आत्महत्या करतो.’ अशी चिठ्ठी लिहीत एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना शहराच्या पूर्व भागातील चिकणी पाडा येथे रविवारी रात्री घडली. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात मुलाच्या आत्महत्येची नोंद करण्यात आली असून, पोलिस तपास करीत आहेत.
चिकणीपाडा येथे प्रमोदकुमार पात्रा हे कुटुंबांसोबत राहतात. ते रविवारी कामावर गेले होते. त्यांची पत्नी आणि मुलगी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. घरात कोणी नसताना विघ्नेश पात्रा (१३) याने गळफास घेऊन आत्महत्या केली. विघ्नेशचे वडील कामावरून परतले तेव्हा विघ्नेशनचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्यानंतर त्यांनी टाहो फोडला.
विघ्नेश हा एका शाळेत आठवीच्या वर्गात शिकत होता. मृत्यूपूर्वी त्याने लिहिलेल्या चिठ्ठीत ‘पप्पा, माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. बहिणीवर रागावू नका. त्या शिक्षिका आणि मुलाने चिडवल्याने मी आत्महत्या करतो.’ असे चिठ्ठीत म्हटले आहे. पालकांकडून तक्रार प्राप्त होताच गुन्हा दाखल केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे
काँग्रेस पक्षाच्या महिलाध्यक्ष कांचन कुलकर्णी यांनी या प्रकरणी पोलिसांना निवेदन दिले आहे. निष्पाप विघ्नेशला मानसिक त्रास देणाऱ्या शिक्षिकेविरोधात पोलिसांनी ठोस कारवाईची मागणी केली. त्याच्या कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे. अन्य मुलांसोबतही हा प्रकार घडला आहे का? याचाही तपास पोलिसांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली.