लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या अल कायदा या संघटनेच्या नऊ संशयित दहशतवाद्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केरळमधील एर्नाकुलम व पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे शनिवारी पहाटे धाडी घालून अटक केली. दिल्लीसह महत्त्वाच्या ठिकाणी घातपात करण्याचा यांनी आखलेला कट एनआयएने उधळून लावला.
अल कायदाचे हस्तक काही राज्यांत सक्रिय असून ते घातपाताच्या विचारात आहेत, अशी माहिती मिळताच त्या प्रकरणी तपास एनआयएने सुरू केला. अटक केलेल्यांपैकी सहा जण पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथील रहिवासी असून नजमूस साकिफ, अबू सुफियाँ, मैनूल मोंडल, लेऊ यीन अहमद, अल्् मामून कमाल, अतितूर रहमान अशी त्यांची नावे आहेत.
अटक केलेले अन्य तीन जण केरळमधील एर्नाकुलम येथे राहत असून त्यांची नावे मुर्शिद हसन, इयाकूब विश्वास, मुशर्रफ हुसेन अशी आहेत. त्यांच्याकडून आक्षेपार्ह कागदपत्रे, जिहादी साहित्य, शस्त्रे, गावठी बंदुका आदी साहित्य जप्त केले आहे.
चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या भारतीय पत्रकारासह तिघांना अटकदेशाच्या सीमेवरील भारतीय लष्कराच्या हालचालींची गोपनीय माहिती चिनी गुप्तहेर यंत्रणांना पुरवत असल्याच्या आरोपावरून संरक्षण विषयावर लेखन करणारे मुक्त पत्रकार राजीव शर्मा तसेच एक चिनी महिला व नेपाळी नागरिक अशा तीन जणांना दिल्ली पोलिसांनी अटक केली. डोकलाम, गलवान येथे भारतीय सैन्य कशा प्रकारे तैनात केले आहे, याची माहितीही राजीव शर्मा चीनला पुरवत होता, असे दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले.