मुंबई - भांडुपमधील वाढती गुन्हेगारी आणि त्याला संबंधित वाढती व्यसनाधीनता याविरोधात भांडुपवासीय एकवटले होते. त्यांनी याविरोधात जनआंदोलन छेडले होते. त्यामुळे कालच भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीनिवास पन्हाळे यांचा पदावरून पायउतार झाला होता. याच पार्श्वभूमीवर ड्रॅग माफियांची पाळेमुळे शोधून काढण्यासाठी अमली पदार्थ विरोधी पथकाने कंबर कसायला सुरुवात केली आहे. या पथकाने भांडुपमधून आठ जणांना अटक करत ९. ३०० किलो गांजा जप्त केला आहे.
भांडुप परिसरात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्यांनी तोंड वर काढले होते. याबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मुंबईपोलिसांच्या अंमली पदार्थ विभाग (एएनसी)कडे तक्रार नोंदवली होती. त्यानुसार पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने बुधवारी रात्री भांडुप येथे विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत ८ तस्करांनाअटक केली असून त्यामध्ये एका ५० वर्षीय महिलेचा ही समावेश आहे. या तस्करांकडून ९ हजार ३०० किलोचा गांजा हस्तगत केला आहे. भांडुपच्या ३९१ बस स्टाॅप, किन्दी पाडा, भांडुप गावदेवी रोड, श्रीराम पाडा परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दुल्यांचा वावर वाढला असल्याची माहिती मुंबईच्या एएनसी पथकाला मिळाली होती. त्याच बरोबर नागरिकांच्या तक्रारी ही येत असल्याने पोलिस आयुक्त सुबोध जैयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपायुक्त शिवदीप लांडे यांच्या पथकाने या भागात धडक कारवाई केली. या कारवाई दरम्यान पोलिसांनी विजय विष्णू पंडीत(२६), मुस्तफा शेख (२१), शक्ती पुजारा(३२), उत्तम कांबळे (४६), कमलेश गौतम (२६), साईपण सांगोली (२१) आणि जसुदा गायकवाड (५०) अशी या आरोपीची नावे आहेत. या सर्वांकडून पोलिसांनी ९ हजार ५०० किलोग्रॅम गांजा हस्तगत केला असून बाजारात त्याची किंमत १ लाख ८६ हजार इतकी आहे. या सर्वांविरोधात पोलिसांनी एडीपीएस कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.