वलसाड - गुजरातच्या वलसाडमध्ये गुन्हेगाराच्या चेहऱ्यावरील पडदा बाजूला करण्यासाठी पोलिसांनी जी शक्कल लढवली त्यामुळे आरोपीनं सत्य उघड केले. २८ ऑगस्टला पारदी परिसरात एका नदी किनारी कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली होती. निर्जनस्थळी उभ्या असणाऱ्या कारच्या मागील सीटवर महिलेचा मृतदेह होता. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली त्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहचले आणि तपासाला सुरुवात झाली.
या महिलेच्या गळ्याभोवती दाबल्याच्या खुणा आढळल्या. त्याचसोबत कारची चावी, महिलेचा मोबाईलसह अन्य गोष्टी गायब होत्या. त्यामुळे ही हत्या असावी असा पोलिसांना संशय आला. मृत महिलेची ओळख पटवणं पोलिसांसाठी आव्हानात्मक होते. त्यात बेपत्ता महिलांची तक्रार पोलिसांनी शोधली. वलसाड शहरात एका व्यक्तीने पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. २७ ऑगस्टला पत्नी कुणालातरी भेटण्यासाठी घरातून निघाली त्यानंतर तिचा मोबाईल स्विच ऑफ लागत होता. ती घरी परतली नाही म्हणून पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
पोलिसांनी संबंधित व्यक्तीला मृत महिलेची ओळख पटवण्यासाठी बोलावलं. तेव्हा पत्नीचा मृतदेह पाहून तो हादरला. मृत महिलेचं नाव वैशाली असून पती हरिशनं तिची ओळख पटवून दिली. त्यानंतर आसपासच्या लोकांनीही हरिश-वैशालीला ओळखलं. वैशाली गरबा सिंगर होती तर पती हरिश गिटार वाजवत होता. मात्र वैशालीची हत्या कुणी केली हा प्रश्न अनुत्तरीत होता. निर्जनस्थळी कार कुणी आणली? वैशालीचा शत्रू कोण होता? या सर्व प्रश्नांची उत्तरे पोलीस शोधत होते.
पोलिसांनी वैशालीच्या पतीची चौकशी सुरू केली. परंतु त्याच्याकडून जास्त माहिती मिळाली नाही. ती कुणाला तरी भेटण्यासाठी घरातून बाहेर पडली मग गेली कुठे? कुणाला भेटली याची माहिती हरिशकडे नव्हती. वैशालीच्या अखेरच्या क्षणी तिच्यासोबत कोण होतं? याचं उत्तर पोलिसांना शोधायचं होतं. पोलिसांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं पती हरिशने दिली त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर कुठलाही संशय नव्हता. त्यामुळे वैशालीच्या मृत्यूचं कारण शोधणं पोलिसांसाठी मोठं आव्हान होते.
वैशालीच्या मोबाईल सीडीआरमधून मिळाला पुरावावलसाड पोलिसांनी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासाला सुरुवात केली. त्यासाठी ८ पथकं बनवण्यात आली. वैशालीच्या फोनचा सीडीआर म्हणजे कॉल डिटेल्स तपासण्यापासून वैशालीच्या घरापासून ती ज्या मार्गाने गेली तेथील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी शोधायला सुरुवात केली. त्यात पोलिसांना २ पुरावे सापडले. सीडीआरमधून वैशाली घरातून निघण्यापूर्वी आणि निघाल्यानंतर बबिता नावाच्या महिलेशी बोलल्याचं कळालं. तर घटनास्थळापासून काही अंतरावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये बबिताच्या हालचाली दिसल्या.
गर्भवती मैत्रिण बबितावर संशय पोलिसांनी बबिताची चौकशी करण्याचा निर्णय घेतला. बबिता ही वैशालीची मैत्रिण होती. परंतु जी बबिताच्या संशयाच्या भोवऱ्यात होती ती ९ महिन्याची गर्भवती होती. त्यामुळे तिची चौकशी करणं कठीण होते. तेव्हा मेडिकल अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पोलिसांनी बबिताची चौकशी केली. त्यावेळी बबिताच्या उत्तरांवरून आणि हालचालींवरून तिचा वैशालीच्या मृत्यूत संबंध असल्याचा संशय बळावला. सुरुवातीला बबितानं पारदी परिसरात गेल्याचा नकार दिला. परंतु पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजबाबत सांगितल्यानंतर बबितानं होकार दिला. त्यानंतर पोलिसांनी तिला बोलण्यात अडकवलं. पोलिसांनी तिला विचारलं की तू वैशालीसोबत दुसऱ्या कुणाला पाहिले होते का? तेव्हा हो तिच्या कारमध्ये २ लोक होते असं सांगितले.
त्यावेळी पोलिसांनी या प्रकरणाशी संबंध नसणाऱ्या व्यक्तीचा फोटो बबिताला दाखवला. तेव्हा बबिताने पोलिसांना हाच माणूस असल्याचं उत्तर दिले. बबिता खोटे बोलत आहे हे पोलिसांना कळालं होते. तेव्हा पोलिसांनी बबिताला तिच्या बोलण्यात फसवून तिच्याकडूनच सत्य उघड करून घेतले. बबितानं वैशालीच्या हत्येमागची कहानी पोलिसांना सांगितली जे ऐकून पोलीस हैराण झाले. २५ लाखांसाठी केला खूनबबिताने कर्जाच्या नावाखाली वैशालीकडून २५ लाख घेतले होते. हेच उधारीचे पैसे वैशाली वारंवार मागत असल्याने बबिताने तिचा काटा काढण्याचं ठरवलं. बबितानं फेसबुकच्या माध्यमातून वैशालीच्या हत्येची सुपारी दिली. वलसाडच्या डायमंड फॅक्टरीजवळ आरोपींना भेटण्यासाठी बबिता पोहचली. तेव्हा बबितानं वैशालीला फोन करून पैसै देण्याचा बहाणा केला. तेव्हा वैशाली कार घेऊन पोहचली. तेव्हा बबिता आणि इतर २ आरोपी तिच्यासोबत कारमध्ये बसले. त्यानंतर जबरदस्तीने तिला बेशुद्ध करत गळा दाबून तिची हत्या केली. त्यानंतर मृतदेह नदी किनारी निर्जनस्थळी टाकून तिघेही पसार झाले.