मीरारोड - मीरारोडच्या नया नगर भागातील एका मशिदीसमोर दुपारची नमाज संपल्यानंतर भगवे झेंडे फडकवून धार्मिक घोषणा दिल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र स्थानिक पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून ६ जणांना अटक केली. तर असाच प्रकार बुधवारी करणाऱ्या तिघांना देखील अटक करण्यात आली. स्थानिक मुस्लिम बांधव संतप्त होऊन जमावाने जमले मात्र त्यांनी शांतता राखली शिवाय पोलिसांनी त्यांची समजूत काढत व आरोपीना अटक केल्याने वाद टळला.
नया नगर परिसर हा मुस्लिम बहुल असून सध्या त्यांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सुरु आहे. दुपारी १ ते २ दरम्यान नमाज अदा केली जात असल्याने गुरुवार ६ एप्रिल रोजी पोलीस उपनिरीक्षक सचिन शेडगे व अंमलदार गोडवे हे गस्त घालत होते. सव्वा २ च्या सुमारास लोढा मार्ग येथील मोहम्मदी मशिदीसमोर गर्दी व गोंधळ दिसल्याने पोलीस तिकडे गेले. त्यावेळी दुचाकी वरून आलेल्या व हातात भगवे झेंडे असलेल्या दोघांना रहिवाशांनी पकडून ठेवले होते.
रहिवाशांनी सांगितले की, नमाजसाठी लोक आले असताना दुचाकी वरून हातात भगवे झेंडे घेऊन आलेल्या तरुणांनी जाणीवपूर्वक मुस्लिम बांधवांकडे पाहून जोराने हॉर्न वाजवले व धार्मिक घोषणा देऊ लागले. त्यामुळे लोकांनी एका दुचाकी वरून जाणाऱ्या दोघांना पकडले तर बाकीचे सर्व पळून गेले. शेडगे यांनी त्या दोघांना पकडून नया नगर पोलीस ठाण्यात आणले. तर अन्य दोघांना निवृत्ती कर्डेल व मनीषा चौधरी ह्या पोलीस कर्मचाऱ्यांनी पकडून आणले.
अभी रवींद्र सिंग (१९) राम राजश्री , इंद्रलोक ; शुभम मुन्ना विश्वकर्मा (१९) रा. महावीर नगर , ऑरेंज रुग्णालय जवळ ; ज्ञानी युवराज रावल (१८) रा. श्री बालाजी कृपा , इंद्रलोक फेज ६ सह एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचा पकडलेल्यात समावेश आहे. नंतर आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.
तर बुधवार ५ एप्रिल रोजी पहाटे नया नगर मधील नीलम पार्क भागातल्या महंमदीया मदरशाजवळ येऊन तिघांनी असाच भगवे झेंडे घेऊन धार्मिक घोषणा देण्याचा प्रकार केला होता. त्याचा निवृत्ती कर्डेल यांच्या फिर्यादी वरून गुन्हा दाखल होऊन पोलीस सीसीटीव्ही आधारे तपास करत होते. फुटेजच्या आधारे शोध घेऊन सहायक निरीक्षक पराग भाट , ओमप्रकाश पाटील , विकास यादव , विजय गुरव, महेश खामगळ यांच्या पथकाने तिघांना गुरुवारी मीरारोडच्या क्वीन्स पार्क मधील पंचरत्न इमारत येथून पकडले आहे.
सततच्या दोन घटनांनी नया नगर परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. मात्र वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिसरात शांतता निर्माण करत आरोपीना गुन्हा दाखल करून तात्काळ अटकेची कारवाई केली. मुस्लिम बांधवानीसुद्धा समंजसपणा दाखवला.
समाजात एकोपा टिकविण्यास बाधक व सार्वजनिक शांततेचा भंग केल्या प्रकरणी २ गुन्ह्यात एकूण ९ जणांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेले सर्व आरोपी हे भाईंदर - मीरारोड पूर्व भागातील तरुण आहेत. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आययुक्त श्रीकांत पाठक सह अन्य अधिकाऱ्यांनी नया नगर मध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला.