नवी दिल्ली - आई-वडील आपल्या मुलांसाठी काहीही करायला नेहमीच तयार असतात. मुलांच्या आनंदातच तिचा आनंद असतो. पण याच दरम्यान नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. मुलीच्या नावे असलेल्या इन्शुरन्स पॉलिसीचे पैसे मिळवण्यासाठी आई आणि सावत्र वडिलांनी नऊ वर्षांच्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लुधियानामध्ये हा भयंकर प्रकार घडला आहे. या दाम्पत्याला आर्थिक अडचण सतावत होती. त्यामुळे त्यांनी पैशासाठी हे क्रूर कृत्य केलं आहे. पोलीस तपासात याबाबत धक्कादायक खुलासा झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 वर्षीय पिंकी आणि तिचा नवरा नरिंदरपाल या दोघांनीही भारती या पिंकीच्या नऊ वर्षीय मुलीचा 19 जून रोजी खून केला. या दोघांनीही भारतीच्या नावावर 2018 मध्ये अडीच लाख रुपयांची इन्शुरन्स पॉलिसी विकत घेतली होती. पोलिसांनी सांगितलं की या दोघांनी 2019 मध्ये तीन लाख रुपयांची जमीन खरेदी केली होती आणि हे त्या जमिनीचे हप्ते भरत होते. त्यांनी 1.49 लाखांचं कर्ज फेडलं होतं. मात्र उरलेलं कर्ज फेडायला त्यांना त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी भारतीचा खून करुन तिच्या इन्शुरन्सच्या पैशातून आपलं कर्ज भरण्याचा प्लॅन केला होता.
नरिंदरपाल हा आपली पत्नी आणि सावत्र मुलगी भारती यांच्यासोबत राहत होता. पशुखाद्य बनवण्याच्या कारखान्यात तो काम करत होता आणि त्याच कारखान्याने दिलेल्या घरात राहत होता. भारती झोपेत असताना या दोघांनी तिला या कारखान्यामध्ये नेलं आणि पिंकी म्हणजे भारतीच्या आईने ओढणीने तिचा गळा आवळला. कोणालाही शंका येऊ नये म्हणून त्यांनी भारती बेशुद्ध असल्याचं नाटक करत तिला रुग्णालयात पोहोचलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शेजाऱ्यांनी देखील पोलिसांना याबाबत माहिती दिली आहे.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, नरिंदरपाल याला भारती आवडत नव्हती कारण ती त्याची सावत्र मुलगी होती. त्यामुळे तो तिला बऱ्याचदा मारहाणही करायचा. पिंकी आणि नरिंदरपाल या दोघांनीही सुरुवातील भारतीचा नैसर्गिकरित्या मृत्यू झाल्याचा दावा केला. मात्र शवविच्छेदनाच्या अहवालातून हे समोर आलं की तिचा मृत्यू गळा आवळल्याने झाला आहे. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर हे दोघेही कबूल झाले आणि आर्थिक अडचण असल्याने मुलीला मारल्याचं सांगितलं. तसेच पैशांसाठी हे कृत्य केल्याचं म्हटलं आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.