लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण (ठाणे) : खोटी कागदपत्रे दाखल करून एका भामट्याने राज्य सरकारचा ८४ कोटी रुपयांचा जीएसटी बुडवल्याची घटना ताजी असतानाच कल्याणमधीलच एका व्यापाऱ्याचा जीएसटी क्रमांक हॅक करून त्याच्यासह राज्य सरकारची ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसांत दाखल झालेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे. या गुन्ह्याचा तपास ठाणे आर्थिक गुन्हे शाखा करीत आहे.
पश्चिमेतील लालचौकी परिसरात राहणाऱ्या किशन पोपट यांची श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट कंपनी आहे. या कंपनीच्या नावे एंजल ब्रोकिंग या कंपनीची फ्रॅन्चायझी घेऊन डिमॅट अकाउंटद्वारे व्यवसाय करत आहेत. या व्यवसायासाठी त्यांनी जीएसटी क्रमांक काढला असून, त्याला लिंक म्हणून त्यांचा मोबाईल क्रमांक आणि ई मेल आयडी दिला आहे.
नेमके काय केले?n एका भामट्याने जीएसटी पोर्टलमध्ये किशन यांच्या कंपनीचा प्लास्टिक खरेदी-विक्रीचा व्यवसाय असल्याचे दाखवून संगणक प्रणालीत फेरफार केला तसेच स्वत:चा मोबाईल व ई-मेल आयडी किशन यांच्या कंपनीच्या जीएसटी क्रमांकाला लिंक केला. n किशन यांच्या श्री कृष्णा इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या नावे जीएसटी काढला आणि नोव्हेंबर २०२० पासून ते २५ जून २०२१ या दरम्यान ५०२ कोटी ४२ लाख ७८ हजार ८५६ रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. परंतु या व्यवसायाची जीएसटीची ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपयांची रक्कम भरली गेली नाही.n दरम्यान, हा फसवणुकीचा प्रकार लक्षात येताच किशन यांनी थेट बाजारपेठ पोलिसांत यासंदर्भात तक्रार दाखल केली.