उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे एका 90 वर्षीय वृद्धाला जन्मठेपेसह 55 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे, तब्बल 42 वर्षे जुन्या एका प्रकरणात न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 1981 मध्ये 10 जणांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात 10 जण दोषी आढळले होते. मात्र, या खटल्याच्या सुनावणीदरम्यान 9 दोषींचा मृत्यू झाला, तर शिक्षा सुनावण्यात आलेला 90 वर्षीय वृद्ध गंगादयाल, एकमेव जिवंत दोषी होता. जाणून घ्या काय होते प्रकरण...?
फिरोजाबादच्या मखनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सादुपूर गावात 1981 साली काही लोकांनी जबरदस्त गोळीबार केला होता. यात 10 जणांचा मृत्यू झाला होता. या गोळीबारात तीन जण जखमीही झाले आहेत. याप्रकरणी फिरोजाबाद रेल्वे स्थानकातील लिपिक डीसी गौतम यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणाचा तपास करून गुन्हा क्रमांक 452/1981 मध्ये कलम 302 आणि 307 अन्वये 10 जणांविरुद्ध मैनपुरी (सध्याचे फिरोजाबाद) जिल्ह्यातील शिकोहाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दहा दोषींमध्ये लज्जाराम यांचा मुलगा गंगादयालचाही समावेश होता. न्यायालयाने 90 वर्षीय गंगादयालला या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा आणि आणि 55 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तसेच अर्थदंड न भरल्यास, अतिरिक्त शिक्षेचाही निर्णय दिला आहे.
वृद्धाला पकडून नेण्यात आले न्यायालयाबाहेर -प्रकरणातील दोषी गंगादयाल यांचे वय अधिक असल्याने त्यांना चालता येत नाही. आसऱ्याशिवाय त्यांना उभेही राहता येत नाही. न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर पोलीस कर्मचारी त्यांना पकडून न्यायालयाबाहेर घेऊन गेले.