पुणे - देशभरात गणपती उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. घरोघरी गणरायाचं थाटात आगमन झाल्यानंतर आता दर्शनासाठी, डेकोरेशन पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. अनेक ठिकाणी दीड दिवसांच्या, ५ दिवसांच्या बाप्पांचं विसर्जनही करण्यात आलं आहे. या सणामुळे बाजारपेठा फुलल्या असून ग्राहकांची मोठी गर्दी दिसून येत आहे. अगदी फुलांपासून ते गोड-धोड पदार्थांपर्यंत, मोदकांपासून ते पनीरपर्यंत मार्केटमध्ये खरेदीसाठी झुंबड दिसून येते. त्यातच, अन्न व औषध प्रशासन विभागाने धाड टाकून तब्बल ९०० किलो पनीर जप्त केलं आहे.
पुण्यातील FDA (अन्न आणि औषध प्रशासन) ने पुण्यातील मांजरी खुर्द येथील एका बेकायदेशीर कारखान्यावर छापा टाकून सुमारे 1.98 लाख रुपये किमतीचे 900 किलो भेसळयुक्त पनीर जप्त केले. त्यासोबतच, येथील कारखान्यातून २.२४ लाख रुपयांचे स्किम्ड मिल्क पावडर आणि आरबीडी पामोलिन तेलही जप्त करण्यात आले आहे. संजय नारागुडे, सहाय्यक आयुक्त, एफडीए, पुणे यांच्या पथकाने आज मांजरी खुर्द येथील कारखान्यावर रेड टाकून ही कारवाई केली. अन्न व औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे इतरही भेसळयुक्त पदार्थ विकणाऱ्या आणि बनवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
सण-उत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात खाद्य पदार्थांची, दुग्धजन्य पदार्थांची मागणी होत असते. या वाढत्या मागणीचा फायदा घेत व्यापारी किंवा कारखानदारांकडून अशाप्रकारे भेसळयुक्त पदार्थ बनवून मार्केटमध्ये खपवले जातात. त्यामुळेच, एफडीएकडून कारवाई करत नागरिकांनाही सतर्कतेचं आवाहन करण्यात आलं आहे.