कल्याण : जीएसटी टॅक्स पोर्टल आणि संगणक प्रणालीत फेरफार करून कल्याणमधील एका व्यापाऱ्याला कोट्यवधींचा गंडा घालणारा आणि जीएसटीची चोरी केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच आकाश आडांगळे याला अटक केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी राजेश ऊर्फ करण राव हा अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. त्याचा पोलीस शोध घेत आहेत. आर्थिक गुन्हे शाखा या प्रकरणात पुढील तपास करीत आहे. तब्बल ९० कोटी ४३ लाख रुपयांची जीएसटीची चोरी केल्याचे उघड झाले आहे.
पश्चिमेतील व्यापारी किशन पोपट यांच्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसांनी गुन्ह्याची व्याप्ती पाहता हे प्रकरण तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे दिले. पोपट यांनी राजेश उर्फ करण राव यास त्यांच्या मालकीच्या इन्व्हेस्टमेंट फर्मच्या नावे जीएसटी नंबर काढण्यासाठी त्यांचा मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी दिला. पोपट यांनी राव याला या कामासाठी १३ हजार रुपयांची फी दिली होती.
राव याने जीएसटी नंबर काढला. मात्र, पोपट यांच्या संमतीशिवाय जीएसटी टॅक्स पोर्टल आणि संगणकात फेरफार करून पाच अब्ज २ कोटी ४२ लाख ७० हजार १९४ रुपयांचा आर्थिक व्यवहार केला. या व्यवहाराची जीएसटीची रक्कम ९० कोटी ४३ लाख ७० हजार १९४ रुपये राज्य सरकारकडे भरली नाही. राव याने पोपट यांच्यासह सरकारची फसवणूक केली. जीएसटीची चोरी केल्याच्या आरोपाखाली त्याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
न्यायालयीन कोठडीत रवानगी
जीएसटी क्रमांकाची लिंक असलेल्या ई-मेल आयडीच्या आधारे पोलिसांना राव व आडांगळे ही दोन नावे निष्पन्न झाली. यापैकी आडांगळे याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. राव या गुन्ह्यातील मुख्य आरोपी असून तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.