जळगाव : विमानात प्रवासात सोबतच्या साहित्याचे वजन वाढविण्यासाठी ऑनलाइन संपर्क साधणे शहरातील डॉक्टर दाम्पत्याला चांगलेच महागात पडले. अवघ्या पाच मिनिटांत त्यांच्या बँक खात्यातून ९२ हजार रुपये काढण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी घडला. यानंतर त्यांनी तातडीने सायबर व जिल्हा पेठ पोलिसांकडे धाव घेतली. मात्र, त्यांनी वेगवेगळी कारणे सांगून गुन्हा दाखल करणे टाळले. त्यामुळे भर उन्हात या दाम्पत्याची फिरफिर झाली.
शहरातील चंद्रप्रभा कॉलनीत वास्तव्याला असलेले डॉ. राजेश राधाकृष्ण मुंगड (वय ६२) यांना परदेशात जायचे असल्याने त्यांचा मुलगा अमोल यांनी पुण्यातून वडील व आई स्वाती यांचे चार दिवसांपूर्वी पुकेट ते बँकाक अशी विमानाची तिकिटे काढली. या मार्गावर विमानात फक्त दहा किलो वजन नेण्यास परवानगी आहे. जास्तीचे साहित्य असल्यास जादाचे दर आकारले जातात. त्यामुळे डॉ. राजेश यांनी मंगळवारी सकाळी ११.३० वाजता ऑनलाइन संपर्क क्रमांक शोधून त्यावर संपर्क केला असता समोरील व्यक्तीने तुम्हाला ३० किलोपर्यंत वजनाचे साहित्य नेता येईल, त्यासाठी फक्त पाचशे रुपये ऑनलाइन भरावे लागतील असे सांगितले.
डॉ. राजेश यांनी होकार दिल्यानंतर त्यांनी एक लिंक पाठवली. या लिंकवर क्लिक केली असता ती डाऊनलोड झाली नाही. समोरील व्यक्तीने पाच मिनिटांत पाच लिंक पाठविल्या, त्याच दरम्यान, क्रेड नावाचे ॲप स्वाती यांच्या मोबाइलवर आपोआप डाऊनलोड झाले. त्यावेळी तुमचे काम झाले असे समोरील व्यक्तीने सांगितले. पाचशे रुपये लिंकवर पाठविल्यानंतर स्वाती मुंगड यांच्या खात्यातून ९२ हजार रुपये कपात झाले व फक्त ७१६ रुपये शिल्लक असल्याचा मेसेज आला.
पोलिसांचे एकमेकांकडे बोट
या प्रकारामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच डॉ. राजेश यांनी तातडीने बँक गाठून झाल्या प्रकाराची माहिती दिली. त्यांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे ते तेथून लगेच सायबर पोलीस ठाण्यात गेले. तेथे पाच लाखांपेक्षा जास्त रक्कम गेली असेल तरच इकडे गुन्हा दाखल होतो, असे सांगून त्यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात पाठविले. तेथे गेल्यावर पोलिसांनी बँकेत जा, आता वेळ नाही असे सांगून फिर्याद घेण्यास टाळले. दोन वेळा पोलीस ठाण्यात गेल्यावर आता मोर्चा आहे, नंतर या, असे सांगून परत पाठविले.