ग्रेटर नोएडा - देवला गावातील २ वर्षीय चिमुकलीचा मृतदेह शेजारच्या खोलीत सापडला आहे. घरातून दुर्गंध येत असल्याने कुलुप उघडून काही लोकांनी आतमध्ये प्रवेश केला तेव्हा भिंतीला लटकवलेल्या लॅपटॉपच्या बॅगेतून रक्ताचे थेंब सांडत होते. मुलगी २ दिवसांपासून बेपत्ता होती. ही बॅग उघडताच त्यात मुलीचा मृतदेह पाहून सगळ्यांनाच धक्का बसला. तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमसाठी पाठवला.
कुटुंबीयांनी आरोप केलाय की, जेव्हा मुलगी बेपत्ता झाली तेव्हापासून शेजारील व्यक्ती तिला शोधण्यासाठी आमची मदत करत होता. त्याच्या खोलीतून दुर्गंधी येत असल्याचं कळाले तेव्हा तो अचानक फरार झाला. चिमुरडीची हत्या का केली याचा पोलीस शोध घेत आहेत. मूळचे चंदौलीचे दाम्पत्य देवला गावात भाड्याच्या खोलीत राहत होते. ७ एप्रिलला मुलीचे वडील ड्युटीवर गेले होते. आई २ वर्षीय मुलगी आणि ७ महिन्याच्या मुलाला घरी सोडून बाजारात गेली होती. त्यावेळी संशयास्पदरित्या मुलगी घरातून बेपत्ता झाली. बाजारातून आई घरी परतली तेव्हा तिला मुलगी दिसली नाही. तिने शोधाशोध सुरू केली परंतु काहीच थांगपत्ता लागला नाही.
रात्री वडील घरी आले त्यांनी तातडीने पोलीस ठाणे गाठत मुलीच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. रविवारी सकाळी शेजारी राहणाऱ्या राघवेंद्र याच्या घरातून दुर्गंध येत होता. लोकांनी त्याच्या रुमचा दरवाजा तोडला तेव्हा लॅपटॉपची बॅग भिंतीला लटकलेली होती. त्यातून रक्त खाली पडत होते. बॅगेभोवती माशा होत्या. मुलीच्या कुटुंबीयांना पोलिसांना कळवले. पोलीस घटनास्थळी पोहचले तेव्हा त्यांनी बॅग उघडून पाहिले तेव्हा त्यात मुलीचा मृतदेह आढळला. या घटनेने गावात खळबळ माजली. आरोपी रात्री उशिरा हा मृतदेह जंगलात फेकणार होता परंतु पकडले जाण्याच्या भीतीने त्याला मृतदेह फेकता आला नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, राघवेंद्र हा एका प्रायव्हेट कंपनीत नोकरी करतो. तो विवाहित असून त्याची पत्नी आणि २ मुले गावी गेले आहेत. तो रूममध्ये एकटाच होता. पीडित कुटुंबासोबत तो २ दिवस मुलीचा शोध घेत होता. मृतदेह त्याच्याच रूममध्ये आहे याचा त्याने काही पत्ता लागू दिला नाही. मात्र त्याच्या रूममधून दुर्गंध येऊ लागल्याची चर्चा सुरू झाली. तेव्हापासून तो फरार झाला. सध्या आरोपी राघवेंद्र फरार असून पोलीस त्याचा शोध घेतल आहेत. त्याच्या अटकेनंतर त्याने ही हत्या का केली हे स्पष्ट होईल. राघवेंद्र हा मुलीला खेळवायचा तिला चॉकलेट द्यायचा असं पीडित कुटुंबाने सांगितले.