मुंबई – दक्षिण मुंबईतील एका प्रसिद्ध रुग्णालयात प्रॅक्टिस करणाऱ्या २४ वर्षीय मानसशास्त्रज्ञाचा जामीन अर्ज विशेष एनडीपीएस कोर्टानं फेटाळला आहे. या डॉक्टरला हॅश ब्राऊनी विकल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोच्या मुंबई यूनिटनं १२ जुलै २०२१ रोजी रहमीन रफिक चरणियाला १० किलो चरस असलेला ब्राऊनी केक आणि ३२० अफू विकल्याच्या आरोपाखाली अटक केली होती.
NCB ने दावा केला होता की, आरोपींनी ब्राऊनी केक चरस आणि अफूच्या मिश्रणाने तयार केला होता. मुंबईतील अनेक पार्ट्यांमध्ये हे केक पुरवठा करण्यात आला. चरणियानं वकील तारक सय्यद यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. यात आरोपीच्या वकिलांनी खोट्या आरोपावरून आणि केवळ संशयातून ही अटक करण्यात आली होती. आरोपी सिंघानिया विद्यापीठातून समुपदेशन मानसशास्त्रात मास्टर्स ऑफ आर्टस करत आहे. तो अभ्यासात हुशार असून पीएचडीसाठी तयारी करत असल्याचं वकिलांनी सांगितले.
तसेच आरोपीवर लावण्यात आलेले एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ३७ या प्रकरणात लागू होत नाही. त्यामुळे २४ वर्षीय युवकाची जामिनावर सुटका करण्यास काहीही अडचण नाही. कारण तपास पूर्ण झाला आहे. आरोपपत्र कधीच दाखल केले गेले आहे असं आरोपीच्या वकिलांनी कोर्टात युक्तिवाद केला. परंतु विशेष सरकारी वकील अद्वेत सेठना यांनी आरोपीच्या जामीन अर्जाला विरोध केला. आरोपीकडून व्यावसायिक वापरासाठीचा ड्रग्सचा साठा जप्त करण्यात आला होता. त्यामुळे याठिकाणी कलम ३७ लागू होते.
दरम्यान, आरोपीचे वकील आणि विशेष सरकारी वकिलाच्या युक्तिवादानंतर कोर्टाचे न्या. राहुल रोकडे यांनी सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत आरोपीचा जामीन अर्ज फेटाळला. कोर्टाने म्हटलं की, अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थांचे मिश्रण देखील तितकेच धोकादायक आहे. ब्राऊनी केकमध्ये मिसळलेले चरसचे व्यावसायिक प्रमाण कलम ३७ अंतर्गत कठोर गुन्हा आहे असं सांगितले आहे.