झारखंडमध्ये २५ वर्षीय विवाहितेने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या महिलेची तब्येत बिघडली असताना कुटुंबाने तिला हॉस्पिटलला नेले. मात्र वाटेतच तिचा जीव गेला. सासरच्या मंडळीकडून महिलेवर अत्याचार सुरू होते असा आरोप तिच्या कुटुंबाने केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे.
महागामाच्या डुमरिया गावातील ही घटना असून शनिवारी रात्री सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला. या मृत युवतीचं नाव काजल कुमारी होते. या महिलेने २ लग्न केली होती. पहिलं लग्न नरोत्तमपूरच्या शिबू नावाच्या युवकाशी केले मात्र घरगुती कारणावरून काही काळाने या दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नारायणपुराच्या एका युवकासोबत महिलेचं अफेअर सुरू होते. या दोघांनी कोर्टात लग्न केले. अलीकडेच या दोघांनी लग्न केले होते.
लग्नानंतर सर्वकाही ठीक सुरू होते. परंतु काही दिवसांनी छोट्या छोट्या गोष्टीवरून दोघांमध्ये वाद सुरू झाले. त्यानंतर काजल तिच्या माहेरी राहू लागली. काजल जेव्हापासून माहेरी राहत होती तेव्हापासून ती मानसिक तणावात होती. ना कुणाशी नीट बोलत होती, एकटी राहायची, कुणासोबत जात नव्हती असं सांगितले. शनिवारी संध्याकाळी ५ च्या सुमारास तिच्या पतीचा फोन आला त्यानंतर काजलनं विष प्यायलं. तब्येत बिघडल्यानंतर कुटुंबाने तिला उपचारासाठी रुग्णालयात नेले मात्र वाटेतच तिने जीव सोडला.
हॉस्पिटलमध्ये पोहचताच डॉक्टरांनी काजलला मृत घोषित केले. या घटनेची माहिती पोलिसांना कळवण्यात आली. पलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमोर्टमसाठी गोड्डा हॉस्पिटलला पाठवला. कुटुंबाच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिलेचा दुसरा पती आणि सासरच्यांवर गुन्हा दाखल केला. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. सुरुवातीला हे प्रकरण आत्महत्या वाटत आहे मात्र पोलीस सर्व बाजूने याचा तपास करत आहेत.