योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: ‘वर्क फ्रॉम होम’च्या नावावर फसवणूक झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका तरुणाला सायबर गुन्हेगारांनी विविध टास्कच्या माध्यमातून आर्थिक फायदा मिळेल असे आमिष दाखवत १.५९ लाखांचा गंडा घातला. सायबर पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम मनोहर मौदेकर (२७, संविधान कॉलनी, समता नगर) या तरुणाला १ जून रोजी व्हॉट्सअपवर ‘वर्क फ्रॉम होम’संदर्भात एक संदेश आला. त्यात ‘ॲमेझॉन’चे ऑर्डर पूर्ण करण्याचे टास्क देण्यात आले व ते पूर्ण केल्यास बोनस मिळेल असे आमिष दाखविण्यात आले. शुभमने ते टास्क पूर्ण केले व समोरील व्यक्तीने बोनसची रक्कम दिली. यामुळे शुभमनचा त्याच्यावर विश्वास बसला व त्यानंतर त्याने टास्कच्या नावाखाली तीन दिवसांत १.५९ लाख रुपये समोरील व्यक्तीला दिले. मात्र समोरून टास्कची रक्कम व बोनस यापैकी काहीही परत केले नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शुभमने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.