कोची - २८ वर्षीय इंस्टाग्राम इन्फ्लुएंसरने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मृत्युपूर्वी तरुणाने इंस्टाग्रामवरुन एक भावूक पोस्ट लिहिली होती. त्याने स्वत:चा फोटो शेअर करत RIP असं लिहिलं होतं. अजमल शरीफ असं या युवकाचे नाव असून तो केरळच्या अलुवाचा रहिवाशी आहे. शुक्रवारी सकाळी ६.३० वाजता अजमलने राहत्या घरात फाशी घेतल्याचे आढळून आले. याबाबत, पोलिसांनी माहिती दिली आहे.
अजमल हा चांगली नोकरी मिळत नसल्याने थोडा डिप्रेशनमध्ये होता, असे त्याच्या कुटुंबीयांनी म्हटले. शवविच्छेदन केल्यानंतर अजमलचे पार्थिव त्याच्या कुटुंबीयांकडे देण्यात आले. त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटलवर १५ हजार फॉलोअर्स आहेत. हे टोकाचे पाऊल उचलण्यापूर्वी अजमलने इंस्टाग्राम अकाऊंटवरुन स्वत:ची जन्मतारीख आणि मृत्यूची तारीख लिहिली होती. तसेच, भावपूर्ण श्रद्धांजली अशी पोस्ट फोटोसह शेअर केली होती. तसेच, 'यह बताते हुए बहुत दुख हो रहा है कि अजमल शरीफ का निधन हो गया है. उसकी आत्मा को शांति मिलें.', असा मजकूरही त्याने लिहिला होता.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला होता. त्यांनीही अजमलच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन करण्यात आलेल्या पोस्टची माहिती दिली. अजमलची पोस्ट वाचून त्याच्या चाहत्यांना, फॉलोअर्संना धक्काच बसला. कारण, अशाप्रकारे कोणीही पोस्ट लिहून आत्महत्या कशी करेल, असा प्रश्नही अनेकांना पडला होता. अजमलला असह्य त्रास होत असेल, म्हणूनच त्याने हे टोकाचे पाऊल उचलले, अशी कमेंट एका युजर्संने केली आहे.