सुरभी शिरपूरकर, लोकमत: वर्ध्यात दारू बंदी असली तरी दारू बंदी जिल्ह्यात दारू पुरवठा करण्यासाठी तस्कर मात्र अनके मार्ग शोधतात. आणि धक्कादायक म्हणजे दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात अवैध दारूची तस्करी करण्यासाठी दारुविक्रेते समृद्धी महामार्गाचा वापर करत आहेत. अमरावती जिल्ह्यातून दारुसाठा समृद्धी महामार्गावरुन वर्ध्यात निर्यात होत आल्याचे कळताच वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेने दारू तस्करांवर कारवाई केली. तर ही कारवाई करताना पोलिसांची चांगलीच दिशाभूल करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
आधी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दारु तस्करी रोखण्यासाठी समृद्धी महामार्गांवर सापळा रचला होता. तर याची कुणकुण दारु विक्रेत्याला मिळाली. त्याने पोलिसांच्या पथकाला जवळपास चार ते पाच तास मागे मागे फिरविले. अखेर दारु विक्रेत्याने थकून जात दारु भरलेली कार सोडून पळ काढला.
पोलिसांनी विटाळा जि. अमरावती येथे शेतातील कच्च्या रस्त्यावरुन कारसह ९ लाख २६ हजारांचा विदेशी मद्यसाठा जप्त केला. कार चालक वर्ध्यातील समतानगर, येथील रहिवासी आरोपी सोनू उर्फ योगेश विश्वकर्मा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून यात आजून काही तस्करांन विरुद्ध कारवाई होण्याची शक्यता आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रात्रगस्तीवर असताना अमरावती जिल्ह्यातून समृद्धी महामार्गावरुन दारुसाठा निर्यात करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सावंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत नाकाबंदी केली. मात्र, आरोपीनी कार समृद्धी महामार्गवरून वरुनच नागपूरच्या दिशेने पलटविली. पोलिसांनी त्याच्या वाहनाचा पाठलाग सुरुच ठेवला. 4 ते 5 तास पोलीस आणि तस्करां मध्ये चकमक सुरूच होती. अखेर आरोपीने कार सुसाट चालवित हळदगाव मार्गाने नेली. तेथून तो पवनार गावात आला, तेथून बायपास मार्गाने जुनापाणी चौकात आला पोलिस त्याच्या मागावरच होते. अखेर चालकाने थकून जात समृद्धी महामार्गाने विटाळा शिवारात एका शेतातील कच्च्या रस्त्यावर कार उभी करुन पळ काढला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारची पाहणी केली असता कारमध्ये मोठ्या प्रमाणात देशी व विदेशी मद्यसाठा आढळून आला. कारसह एकूण ९ लाख २६ हजारांचा दारुसाठा जप्त करीत आरोपीविरुद्ध सावंगी पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशात पोलिस उपनिरीक्षक बालाजी लालपालवाले यांच्या नेतृत्वात करण्यात आली. दारू बंदी असलेल्या वर्ध्यात हे तस्कर दारू कुठे विकणार होते याचा तपास पोलीस करतायेत.