मुंबई : वांद्रे रेल्वे ब्रिज परिसरात ५० मोटर सायकलस्वार हे दुचाकीचे पुढचे चाक हवेत उचलून रॅश ड्रायव्हिंग करत भरधाव वेगाने स्टंटबाजी करताना रविवारी पहाटे सापडले. त्यांच्या विरोधात वाहतूक पोलीस कारवाई करायला गेल्यानंतर पळणाऱ्या चालकांपैकी राजकुमार उमाशंकर कनोजिया (२१) हा स्टंट करताना खाली पडून जखमी झाला. त्यानुसार याप्रकरणी बीकेसी वाहतूक विभागाने दिलेल्या तक्रारीनंतर वांद्रे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वांद्रे पोलिसात दाखल झालेल्या एफआयआरनुसार, २४ डिसेंबर रोजी पहाटे ३.१५ च्या सुमारास कंट्रोल रूमवरून बीकेसी वाहतूक विभागाला वांद्रे ब्रिजवर काही मोटर सायकलस्वार स्टंट करत असून त्यांच्यावर कारवाई करा असा कॉल प्राप्त झाला. त्यानुसार पोलीस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा वांद्रे ब्रिजवर जवळपास ५० मोटरसायकलस्वार हे दुचाकी मोठमोठ्याने हॉन वाजवत सायलेन्सरचा कर्कश आवाज करत, मोटरसायकलचे पुढील चाक उचलून इतरांच्या गाड्यांना कट मारत भरधाव वेगाने चालवत असल्याचे त्यांना दिसले.
तसेच पोलिसांना पाहिल्यानंतर हे दुचाकीस्वार तिथून पळू लागले. त्या दरम्यान विना हेल्मेट असलेला कनोजिया वांद्रा सिलिंकजवळ जाणाऱ्या कलानगर मार्गाजवळ स्टंट मारताना खाली पडला. पोलिसांनी त्याला आणि त्याच्या गाडीला उचलले. मिरा रोडचा रहिवासी असलेल्या जखमी कनोजियाच्या गाडीच्या मागे नंबर प्लेट, दोन्ही साईड मिरर नव्हते. गाडीचा आवाज मोठा व्हावा म्हणून त्याने सायलेन्सरही काढत बेकायदेशीरपणे मॉडिफिकेशन केले होते. त्यानुसार वांद्रे पोलिसांच्या मदतीने त्याला उपचारासाठी भाभा रुग्णालयात दाखल करवले. तसेच उपचार करवून वांद्रे पोलीस ठाण्यात नेत गुन्हा दाखल करण्यात आला.