लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: आईच्या उपचारासाठी पैसे हवे असल्याचे सांगून ४ लाखाच्या फसवणुकीची घटना घडली आहे. अडीच वर्षांपासून ओळख असलेल्या पुणेच्या आंबा विक्रेत्याने मुंबईच्या व्यावसायिकाला विश्वासात घेऊन हि फसवणूक केली आहे. यावेळी त्याने रकमेच्या बदल्यात १० तोळे दागिने तारण देतो सांगून रद्दीने भरलेली बॅग देऊन धूम ठोकली.
मुंबईत राहणारे फोटो फ्रेम व्यावसायिक अली अकबर मोहम्मद हुसेन काचवाला (६२) यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. ते पुणेत मुलाकडे रहायला असताना अडीच वर्षांपूर्वी त्यांची डीमार्ट बाहेर आंबे विकणाऱ्या आलम सरफराज याच्यासोबत ओळख झाली होती. यावेळी काचवाला यांना त्याच्यावर विश्वास बसल्याने कार्यालयीन कामकाजासाठी देखील रोख मानधनावर त्याला कामावर ठेवले होते. मात्र यादरम्यान त्यांनी आलम याच्याबद्दलची कसलीच अधिक माहिती मिळवली नव्हती. काचवाला हे मुंबईत असताना २९ सप्टेंबरला आलम याने फोन करून आईच्या उपचारासाठी ४ लाख रुपये हवे असल्याचे सांगितले. त्यासाठी तारण स्वरूपात आईचे दहा तोळे सोन्याचे दागिने देतो असेही त्याने सांगितले होते. त्याच्यावर विश्वास ठेवून शनिवारी ते चार लाख रुपये घेऊन सानपाडा स्थानकाबाहेर आले होते. त्याठिकाणी आलम याची भेट झाल्यानंतर तो रिक्षातून त्यांना घेऊन तुर्भेत आला. त्याठिकाणी त्याने काचवाला यांच्याकडे एक बॅग देऊन पैशाची बॅग घेऊन ती घरी ठेवून येतो सांगून गेला. मात्र तो परत न आल्याने त्याने दिलेली बॅग उघडून बघितले असता त्यात कागदाचे बंडल आढळून आले. शिवाय त्याचा फोन देखील बंद आढळून आला. यावरून आपली फसवणूक झाल्याचे काचवाला यांच्या लक्षात येताच त्यांनी एपीएमसी पोलिसांकडे तक्रार केली आहे.