मुंबई : एअरपोर्ट मधील एका प्लेनमध्ये बॉम्ब ठेवला आहे, ते प्लेन दहा तासानंतर उड्डाण करणार आहे" या कॉलने गुरुवारी खळबळ उडाली. चौकशीत हा कॉल साताऱ्यातील १० वर्षाच्या मुलाने वडिलांच्या मोबाईलवर कॉल केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी सहार पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे.
या कॉलच्या अनुशंगाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर तात्काळ बैठक घेण्यात आली. सहार पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि एटीसी पथक, एजेन्सीचे प्रतिनिधी उपस्थित होते. चौकशीत, तो कॉल खोटा असल्याचे समजताच सर्वानी सुटकेचा निश्वास टाकला. नवी मुंबईच्या नियंत्रण कक्षात हा कॉल आला होता. ज्या क्रमांकाने कॉल आला तो सातारा येथील देऊळ गावातील विकास माणिकचंद देसाई यांचा क्रमांक असल्याचे समजले. पोलिसांनी त्यांच्याकडे चौकशी करताच, तो कॉल त्यांचा १० वर्षीय दिव्यांग मुलाने चुकून केल्याचे सांगितले. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहे.