झुंझुनू – राजस्थानच्या झुंझुनू इथं शेतात लोखंडाच्या पेटीत मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ माजली. ही घटना पिलानी क्षेत्रातील ढक्करवाल गावातील आहे. जिथे मुलाचा मृतदेह सापडला ते शेतात कामासाठी आलेल्या बंगाली मजुराच्या नातवाचा असल्याचे बोलले जाते. शेतमालकाने मुलाच्या आजी-आजोबाविरोधात हत्येची तक्रार दाखल केली आहे. मृत मुलगा त्याच्या आजी-आजोबासह शेतातील एका खोलीत राहत होता.
शेतमालकाला फोन करून मजूर सुरेशने सांगितले की, तुमच्या शेतात लोखंडी पेटीत माझ्या नातवाचा मृतदेह आहे. त्याच्यावर अंत्यसंस्कार करा. त्यानंतर जमीन मालकाने पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांना हा प्रकार सांगितला. घटनास्थळी पोहचलेल्या पोलिसांनी लोखंडी बॉक्स उघडून पाहिला तर त्यात मुलाचा मृतदेह होता. सध्या हा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला असून तो पिलानी हॉस्पिटलमध्ये शवागृहात ठेवला आहे.
या मुलाच्या मृत्यूसाठी मजूर सुरेशवर संशयाची सुई आहे. सुरेश महिनाभरापूर्वी पश्चिम बंगालहून शेतीच्या कामासाठी इथं आला होता. सुरेश त्याची पत्नी आणि नातू सूर्यासोबत शेतात बनवलेल्या एका खोलीत राहत होता. सूर्याच्या वडिलांचे निधन झाले आहे. तर त्याची आई त्याला सोडून गेली आहे. सूर्या हा त्याच्या आजी आजोबांसह राहायला होता. रविवारी संध्याकाळी सुरेश आणि त्याची पत्नी अचानक गायब झाली. पिलानी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. अद्याप सूर्याची हत्या कुणी आणि का केली याचा तपास लागला नाही.
दरम्यान, मृत मुलाचे आजोबा सुरेश यांनी जमीन मालक रामपाल सिंह यांचा मुलगा अनिलला फोन करून शेतात ठेवलेल्या लोखंडी बॉक्सची माहिती दिली. या बॉक्समध्ये नातवाचा मृतदेह असून त्याच्यावर अंत्यसंस्कार करा असं म्हटलं. अनिलने जेव्हा सुरेशला तुम्ही न विचारता कसे गेला? असा प्रश्न केला असता मी हे नंतर सांगेन असं सुरेशने म्हटलं. सध्या बॉक्समध्ये ठेवलेला सूर्याचा मृतदेह आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करावे अशी विनंती त्यांनी केली. पोलिसांकडून या जोडप्याचा शोध घेतला जात आहे.