लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वडिलांच्या मृत्यूपश्चात त्यांच्या गुंतवणुकीचे पैसे वारसांना देण्यासाठी १ लाख ४५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या पेण (रायगड) शाखेतल्या मुकेश कुमार या अधिकाऱ्याला सीबीआयने अटक केली.
पेणमधील रहिवासी असलेल्या एका व्यक्तीच्या मृत्यूनंतर मुकेश कुमार याने त्याच्या मुलीला फोन करून बँकेत बोलावून घेतले होते. तुमच्या वडिलांनी ज्येष्ठ नागरिक बचत योजनेमध्ये पैसे गुंतवले होते. ते पैसे तुमच्या आईच्या खात्यात वारस म्हणून हस्तांतरित करायचे आहेत आणि हे करण्यासाठी त्याने सुरुवातीला २५ हजारांची लाच मागितली.
तसेच हे पैसे म्युच्युअल फंडामध्ये गुंतले असून ती रक्कम १० लाख ९० हजार रुपये असल्याचे सांगितले. त्यापैकी ९० हजार मी तुमच्या आईच्या खात्यात जमा करतो व उर्वरित १० लाख सिस्टीमॅटिक विड्रॉअल योजनेद्वारे दर महिन्याला साडे सहा हजार याप्रमाणे आईच्या खात्यात जमा करतो असे मुकेश कुमार याने सांगितले.
काम करून देण्यासाठी एक लाख २० हजार रुपयांची लाच मागितली. हा व्यवहार तुम्ही तुमच्या आईला सांगू नका. मला तुम्ही जे पैसे द्याल त्यातील २० हजार मी तुमचा वाटा म्हणून तुम्हाला देतो असेही मुकेश कुमार याने या महिलेला सांगितले. त्या महिलेने सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सीबीआयने त्याची पडताळणी करत मुकेश कुमार याच्या विरोधात कारवाई केली.