राजकुमार जाेंधळे, लातूर: चार महिन्यांचा पगार काढण्यासाठी केलेल्या मदतीचा माेबदला म्हणून, पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणीसाठी पासवर्ड देऊन लवकर पाठविण्यासाठी लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्याला अडीच हजारांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने मंगळवारी रंगेहाथ पकडले. दारू आणि मटणसाठी त्याने अडीच हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लातूर जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने चार महिन्यांचा पगार काढावा, पेन्शनची फाईल नागपूरला पासवर्ड देऊन पाठवावी, अशी मागणी केली हाेती. दरम्यान, डायटचा प्राचार्य राजेंद्र नेपाळबुवा गिरी (वय ५८, रा. लातूर) याने मदतीचा माेबदला म्हणून, पेन्शनची फाईल नागपूर कार्यालयात पडताळणीसाठी पासवर्ड देत लवकर पाठवताे, असे सांगत पार्टी म्हणून दारू आणि मटणसाठी अडीच हजारांच्या लाचेची मागणी केली. दरम्यान, याबाबत संबंधित कर्मचाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या पथकाने मंगळवारी सापळा लावला. दरम्यान, पंचासमक्ष २ हजार ५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. याबाबत लातूर येथील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती एसीबीचे उपअधीक्षक पंडित रेजितवाड यांनी दिली.