मुंबई - मालाड पश्चिम परिसरात नाल्यावर ठेवलेला सहा हजार किलो वजनाचा लोखंडी पूल चोरल्याच्या आरोपाखाली बांगुरनगर पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. याप्रकरणी अदानी कंपनीने तक्रार दाखल केली होती. अधिक तपासात पोलिस कंपनीच्या एका कर्मचाऱ्याकडे जाऊन पोहोचले. त्याला पूल बांधण्याचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानुसार पोलिसांनी गेल्या आठवड्यात कर्मचारी आणि त्याच्या तीन साथीदारांना अटक केली. कंपनीनेही या वृत्तास दुजोरा दिला आहे.
एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ९० फूट लांबीचा हा पूल होता. अदानी वीज कंपनीने मोठ्या आकाराच्या तारांची ने आण करण्यासाठी तो तयार केला होता. मात्र, २६ जून रोजी हा तात्पुरता गायब झाल्याचे आढळून आल्याने वीज कंपनीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी जवळपासच्या भागात बसवलेल्या कॅमेऱ्यांचे फुटेज स्कॅन केले. त्यात ११ जून रोजी एक मोठे वाहन पुलाच्या दिशेने जात असल्याचे दिसले. त्यानंतर पोलिसांनी नोंदणी क्रमांकावरून वाहनाचा माग काढला. वाहनातील गॅस कटिंग मशीनचा वापर करत पूल तोडून लोखंडाची चोरी करण्यात आली.