वर्धा: आगारात बस उभी करुन दुचाकीने घराकडे जात असलेल्या बस चालकास दुचाकीवर आलेल्या चौघांनी रस्त्यात अडवून चाकूचा धाक दाखवून चालकाकडील रोख रक्कम व आवश्यक कागदपत्रं असा एकूण १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून पळ काढला. ही घटना पुलगाव ते विजयगोपाल रस्त्यावर एकंबा फाटा परिसरात १७ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. पोलिसांनी याप्रकरणी पुलगाव पोलिसांनी ओंकार वासनिक रा. पुलगाव यास अटक केली. तर विकेश पोयाम, प्रथम चपटकार रा. पुलगाव आणि प्रीन्स सोनकर रा. नागपूर यांच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक शैलेश शेळके यांनी दिली.
प्रवीण विजय तिवरे रा. तळणी भागवत हा देवळी-पुलगाव आगारात चालक म्हणून कर्तव्यावर आहे. कर्तव्य बजावून तो १७ रोजी रात्रीच्या सुमारास आगारात बस उभी करुन त्याच्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाला असता एकांबा फाट्याजवळ दोन दुचाकी प्रवीणच्या दुचाकीला आडव्या झाल्या दोन दुचाकींवर आलेल्या चौघांपैकी एकाने चाकूचा धाक दाखवून प्रवीणच्या पाकिटातील १८०० रुपये रोख तसेच मोबाईल व आधारकर्ड, दोन एटीएम कार्ड, चालक परवाना, ओळखपत्र असा एकूण १२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल हिसकावून दुचाकीने धूम ठोकली.
घाबरलेल्या प्रवीण तिवरे याने थेट पुलगाव पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांसमोर कथित केला. पोलिसांनी तत्काळ तपासचक्र फिरवून आरोपी ओंकार वासनीक रा. पुलगाव याला अटक करुन दोन दुचाकी जप्त केल्या. इतर आरोपींचा शोध सुरु असून लवकरच त्यांच्या मुसक्या आवळणार असल्याचे शैलेश शेळके यांनी सांगितले.