अरुण आडिवरेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, रत्नागिरी : शहर पाेलिसांच्या विशेष पथकाने रत्नागिरी शहरातील एका घरात छापा टाकून २.९४ ग्रॅम ब्राऊन हेराॅईन आणि १६.५८ ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही कारवाई शुक्रवारी (१२ मे) रात्री ११:५५ वाजता धनजीनाका-आंबेडकर राेड येथे करण्यात आली. या कारवाईत दाेघांना अटक केली असून, त्यांना १५ मेपर्यंत पाेलिस काेठडी ठाेठावण्यात आली आहे.
मुबिन रशिद हकीम (२२, रा. धनजीनाका, आंबेडकरवाडी रत्नागिरी), मस्तान मकदुम शेख (२४, रा. मच्छिमार्केट, बाजारपेठ, रत्नागिरी) अशी दाेघांची नावे आहेत. स्थानिक गुन्हा शाखेचे पाेलिस अंमलदार शांताराम झाेरे यांना धनजीनाका-आंबेडकरवाडी राेड येथील रशिद हकीम याचा मुलगा मुबीन हकीम त्याच्या घरी अमली पदार्थाची विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पाेलिसांनी शुक्रवारी रात्री घरावर छापा टाकला. घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खाेलीत दाेघेजण संशयितरित्या बसलेले हाेते. तसेच खाेलीत फाॅईल पेपरचे तुकडे, सिगारेटचे अर्धवट जळालेले तुकडे दिसले.
त्यानंतर मुबिन हकीम याची अंगझडती घेतली असता प्लास्टिकच्या पिशवीमध्ये कागदाच्या एकूण ११५ लहान पुड्यांमध्ये टर्की पावडर व स्माेकिंग ब्राऊन पेपर मिळाले. तसेच मस्तान मकदुम शेख यांची अंगझडती घेतली असता पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये गांजा सापडला. या अमली पदार्थांची तपासणी केली असता ब्राऊन हेराॅईन व गांजा असल्याचे निष्पन्न झाले. दाेघांवर एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब), २२ (ब), २९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई परिविक्षाधीन पाेलिस उपअधीक्षक डॉ. समाधान पाटील, नियंत्रण कक्षाचे सहायक पाेलिस निरीक्षक संजय पाटील, अमर पाटील, शीतल पाटील, सहायक पाेलिस फाैजदार विलास दिडपसे, पाेलिस हवालदार शांताराम झोरे, नितीन डोमणे, अरुण चाळके, बाळू पालकर, सागर साळवी, प्रवीण खांबे, सत्यजित दरेकर, योगेश नार्वेकर, विवेक रसाळ, विद्या लांबोरे, छाया चौधरी, सांची सावंत, अक्षय कांबळे यांनी केली.