नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: लगट करून महिलेसोबत गैरवर्तन कले. मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी माय कार शोरूमच्या ‘सीईओ’ विरोधात गुन्हा दाखल केला. हा प्रकार २५ एप्रिल २०२३ ते २४ ऑगस्ट २०२३ दरम्यान वाकड येथील भूमकर चौकाजवळ घडली.
या प्रकरणी २७ वर्षीय पीडित महिलेने गुरुवारी (दि. २१) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, सीईओ सोमन गौडा अमृता गौडा पाटील (४८, रा. आदर्शनगर, मुकाई चौक, किवळे) याच्यासह अन्य दोन महिलांवर गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला भूमकर चौक, वाकड येथील माय कार शोरूममध्ये काम करीत होत्या. दरम्यान, सीइओ पाटील याने पीडित महिलेशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच, अश्लील इशारे करीत महिलेला केबिनमध्ये बोलवले. पीडित महिलेने याकडे दुर्लक्ष केले असता इतर महिलांनी पीडितेवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. ‘‘पाटील सरांसोबत बोलत जा, ते तुझा व मुलाचा सांभाळ करतील, तुला काही अडचण येणार नाही’’, असे इतर दोन महिला बोलल्या. त्यास पीडितेने स्पष्ट नकार दिला. त्यावेळी त्यांनी आपसात संगनमत करून पीडितेची बदनामी करीत तिला कामावरून काढून टाकले. दरम्यान, जुलैच्या शेवटच्या आठवड्यात पीडित महिला पार्किंगमधून दुचाकी काढत असताना सीईओ पाटील याने त्यांच्याशी गैरवर्तन केले, असे फिर्यादीत नमूद आहे. भूमकर चौक, वाकड येथील माय कार शोरुममध्ये काही दिवसांपूर्वी देखील असाच प्रकार समोर आला होता. त्यावेळी देखील एका पीडित तरुणीने हिंजवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यानुसार, सीईओ पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे. गुरुवारी (दि. २१) सलग दुसरा गुन्हा दाखल झाला.