मुरलीधर भवार,कल्याण: शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पदाधिकारी वंडार कारभारी यांच्या विरोधात खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या इंजिनिअरकडे कारभारी याने एक लाख रुपये मागितल्याच्या आरोप करण्यात आला आहे. मात्र हा प्रकार खोटा असल्याचा खुलासा कारभारी यांनी केला आहे.
शहराच्या पश्चिम भागातील उंबर्डे परिसरात रस्ते विकासाचे काम सुरु आहे. हे काम स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत केले जात आहे. याठिकाणी ४ जानेवारी रोजी काम सुरु असताना सिव्हील इंजिनिअर महेश जमाकंडी उपस्थित होते. त्यांच्यासोबत काही कामगारही होते. त्याठिकाणी कारभारी आले. त्यांनी काम बंद कर असे सांगून दमदाटी केली. साहेबाकडून एक लाख रुपये आणून दे अशी मागणी केली. या प्रकरणी एन. ए . कंत्रट कंपनीचे मॅनेजर खलील पाटणकर यांनी खडकपाडा पोलिस ठाण्यात कारभारी यांनी एक लाख रुपये मागितल्या प्रकरणी तक्रार दिली आहे. पोलिसांनी कारभारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान यासंदर्भात कारभारी यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी काम सुरु आहे. त्याठिकाणी रस्त्याखाली असलेल्या सेवा वाहिन्या हलविण्याविषयीची चर्चा झाली होती. तेव्हा इंजिनिअरने मान्यही केले होते. मात्र पैसे मागितल्याचा आरोप धादांत खोटा आणि निराधार आहे. तक्रारदाराकडे काही पुरावा असल्यास त्याने तो सादर करावा. पोलिसांनीही कारभारी याच्याकडे विचारणा न करता थेट गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पक्षाचे शहर प्रमुख सचिन बासरे यांनी पोलिस अधिका:यांची भेट घेतली. राजकीय आकसापोटी कोणाच्या तरी सांगण्यावरुन कार्यकत्र्याच्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात येत असल्याचा आरोप बासरे यांनी केला आहे.