नवी मुंबई: महानगर पालिका रुग्णालयात 28 मार्च 2019 ला उपचारादरम्यान विक्की इंगळे या तरूणाचा मृत्यू झाला होता. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला होता. या प्रकरणी सीबीडी प्रथम दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व सहा डाॅक्टर अशा सात जणांवर रात्री सव्वाअकरा वाजता वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये माजी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्यासह महानगरपालिकेच्या वाशी प्रथम संदर्भ रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रशांत जवादे, हेमंत इंगोले, किरण वळवी, प्रभा सावंत, शरीफ तडवी व आरती गणवीर यांचा समावेश आहे. महानगर पालिका परिवहन समितीचे सदस्य राजेंद्र इंगळे यांचा मुलगा विक्की याची प्रकृती बिघडल्याने त्याला 28 मार्च 2019 ला महानगर पालिका रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. डाॅक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला होता. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली होती. यासाठी अनेकवेळा आंदोलन ही केले होते. तत्कालीन आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी चौकशी समिती नेमली. या समितीमध्येही डाॅक्टरांनी निष्काळजीपणा केल्याचे निदर्शनास आले होते. पण मिसाळ यांनी काहीच कारवाई केली नव्हती.
या प्रकरणी पालकांनी न्यायालयात ही धाव घेतली होती. न्यायालयाने सीआरपीसी कलम 156(3) प्रमाणे कारवाई चे आदेश 6 डिसेंबर ला दिले होते. या प्रकरणी गुरूवारी रात्री सव्वाअकरा वाजता वाशी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे.