जळगाव : वेतनवाढ मान्य नसल्यामुळे रेमंड कंपनीमधील काही कामगारांनी संप पुकारला आहे. त्यामुळे कंपनीचे कामकाज २४ तारखेपासून बंद असून कंपनीच्या ५० मीटरच्या आवारात कुणीही गर्दी करू नये असे आदेश औद्योगिक न्यायालयाने दिले असताना सुद्धा माजी महापौर ललित कोल्हे व त्यांच्यासह पाच ते सहा जणांनी गैरकायद्याची मंडळी जमवून न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी मंगळवारी रात्री ११.३० वाजता एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रभारी मुख्य प्रबंधक प्रफुल्ल दत्तात्रय गोडसे यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार, माजी महापौर ललित कोल्हे व पाच ते सहा जण मंगळवारी दुपारी १ वाजता रेमंड कंपनीच्या ५० मीटरच्या आत येऊन कामबंद आंदोलनाबाबत मीडियाला माहिती देत होते. यासंदर्भात सिक्युरिटी इन्चार्ज गिरधारी कुर्वे यांना गोडसे यांना कळविले. त्यानंतर कुर्वे यांनी कोल्हे यांना समजावून सांगून कंपनीच्या ५० मीटर बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर आपण कुठलेही आंदोलन करत नसल्याचे सांगत कोल्हे व इतर लोक ५० मीटरच्या आतच थांबून राहिले.
हा प्रकार कुर्वे यांनी गोडसे यांना कळविला. त्यानंतर रात्री गोडसे यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार न्यायालयाचे आदेशाचे उल्लंघन करून गैरकायद्याची मंडळी जमविल्याप्रकरणी कोल्हेंसह पाच ते सहा जणांविरूद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.