ठाणे : दोन दिवसापूर्वी उपवन येथे टोईंग वाहन चालकाकडे परवान्याची प्रत नसल्याचे चित्रीकरण समाजमाध्यमावर प्रसारित करणाऱ्या व्यक्तीच्या विरोधात हे प्रकरण चांगलेच अंगलट आले आहे. हे चित्रीकरण प्रसारित करणाऱ्या चेतन चिटणीस आणि रुतू टेलर या दोघांविरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाणे वाहतुक पोलिस विभागाने दिली आहे. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप शिरसाठ यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रस्त्याच्या कडेला, रस्ता अडविणाऱ्या वाहनांमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडी होत असते, ती टाळण्यासाठी वाहतुक पोलिसांच्या माध्यमातून टोईंग व्हॅनच्या माध्यमातून वाहनांवर कारवाई केली जात असते. दरम्यान या कारवाईच्या विरोधात काही दक्ष नागरीकांनी यापूर्वी देखील आवाज उचलेला आहे. दुसरीकडे उपवन येथे टोईंग वाहन चालविणाऱ्या चालकाकडेच वाहन परवाना नसल्याचा प्रकार समोर आला होता. त्याचे चित्रीकरण सोशल मिडियावर प्रसारित झाले होते. यामध्ये चेतन चिटणीस नावाची व्यक्ती टोईंग वाहन चालकाकडे वाहन परवान्याची तसेच टोईंग वाहनाच्या कागदपत्रांची मागणी केली. त्यावेळी संबंधित चालकाकडे वाहन परवाना नसल्याचे चित्रीकरणामध्ये दिसत होते. हे चित्रीकरण सोमवारी दिवसभर सोशल मिडियावर प्रसारित झाली होती.
याप्रकरणात ठाणे पोलिसांनी चिटणीस आणि टेलर या दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. चेतन चिटणीस आणि रुतू टेलर यांनी शासकीय कामात अडथळा आणला. तसेच टोईंग वाहनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना फटके मारण्याची धमकी देत चिथावणी दिली. टोईंग वाहनावरील चालकाने वाहन परवान्याची छायांकित प्रत दाखवली, असे असतानाही चिटणीस आणि टेलर यांनी टोईंग वाहनावरील वाहने सोडण्याची जबरदस्ती केली. त्यानंतर टोईंग वाहन जाऊ दिले, असे तक्रारीत म्हटले आहे.