मुंबई: मालाड पश्चिमच्या केक शॉपमध्ये कामगाराने ८० हजार रुपयांचा डल्ला मारल्याचा आरोप आहे. याप्रकरणी दुकान मॅनेजर च्या तक्रारीवरून अभिषेककुमार बर्मन (१९) नामक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
तक्रारदार संदीप मगर (३१) हा मालाड पश्चिमच्या युनिटी हाइट्स बिल्डिंगमध्ये असलेल्या मेरवांस केक शॉपमध्ये मॅनेजर पदावर काम करतो. त्याच्या तक्रारीनुसार, बर्मन हा शॉपमध्ये काऊंटर स्टाफ म्हणून कार्यरत आहे. तो मध्यप्रदेशचा रहिवासी असून अन्य सहकाऱ्यासोबत दुकानातच झोपतो. दिवसभर शॉपच्या गल्ल्यात जमा झालेले पैसे मालक घेऊन जातात तर थोडेफार पैसे त्यात ठेवतात. असे बरेच पैसे गेल्या नोव्हेंबर पासून गायब होत होते.
दरम्यान, बर्मनला चोरी करताना एकदा पकडण्यात आले. त्यामुळे त्याला काउंटर वरून काढून दुसरीकडे काम दिले गेले. मात्र दुकानाच्या हिशोबात जवळपास ८० हजार रुपयांची तफावत आढळली तेव्हा त्यानेच ही चोरी केल्याचा संशय आला आणि मॅनेजरने बर्मनविरोधात पोलिसात तक्रार केली.