नागपूर - मुलींना पास करण्याचे आमिष दाखवून सेक्सची डिमांड करणाऱ्या एका प्राध्यापकावर पाचपावली पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या घडामोडीमुळे विद्यार्थांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
राकेश गेडाम नामक हा प्राध्यापक सिंधू महाविद्यालयात आहे. या महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सला १९ वर्षीय विद्यार्थीनी शिकते. गेल्या वर्षी तिचे अॅडमिशन कुठेच होत नव्हती. एका मैत्रीनीने दिलेल्या सल्ल्यानुसार, ऑक्टोबर २०२१ मध्ये ती गेडामला भेटली. त्यावेळी त्याने तिचे अॅडमिशन करून देण्यास मदत केली. यानंतरही त्याने तिला मदत केली. मात्र, विद्यार्थीनीच्या तक्रारीनुसार, तो तिला प्रत्येक वेळी स्पर्ष (बॅड टच) करायचा. ‘तू बहोत क्यूट है. प्रोफाईल मे अलग दिखती है, ऐसे अलग दिखती है’, म्हणायचा. एकदा तर, पास होने के लिये तू क्या कर सकती है, असेही त्याने तिला विचारले होते.
मुलीला अॅडमिशनसाठी अडीचशे रुपये कमी पडल्यामुळे आरोपीने आपल्या एका सहकाऱ्याला स्वतःचे कार्ड देऊन एटीएममध्ये पाठविले होते. त्यावेळी त्याच्या कक्षात त्याने नको त्या ठिकाणी हात लावल्याचेही तक्रारीत नमूद आहे. काही दिवसांपासून त्याचे चाळे जास्तच वाढल्याने आणि त्याचा बोभाटा झाल्याने विद्यार्थीनीने मित्र-मैत्रीणींना ही बाब सांगितली. त्यानंतर अशाच प्रकारे अनेक विद्यार्थीनीसोबत त्याने लगट करून त्यांना सेक्सची डिमांड केल्याची ओरड झाली. कुणाला पास करण्याचे आमिष, तर कुणाला फेल करण्याची धमकी देऊन तो हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत होता, असा आरोपही संतप्तांनी केला.
यामुळे शुक्रवारी सायंकाळी विद्यार्थिनीने आपल्या काही मित्र-मैत्रीणींसोबत पाचपावली पोलीस ठाणे गाठले. प्रकरणाचे गांभिर्य लक्षात घेत पोलिसांनी विद्यार्थिनीचा सविस्तर जबाब नोंदवून घेत आरोपी प्रा. गेडामवर गुन्हा दाखल केला.
बर्थ डे गिफ्ट डिमांड -काही दिवसांपूर्वी गेडामचा बर्थ डे असल्याने प्रथम वर्षाचे अनेक विद्यार्थी - विद्यार्थीनी नंदनवन भागातील एका दुसऱ्या कॉलेजमध्ये गेले होते. तेथे एका विद्यार्थ्याला बर्थ डे गिफ्टच्या बदल्यात ‘एक नाईट के लिये किसी को राजी कर ले’ असे गेडाम याने म्हटले होते, असाही गंभीर आरोप या तक्रारीत आहे.
महाविद्यालय प्रशासनावर बोट -गेडामने अशा प्रकारे अनेक विद्यार्थीनींसोबत लज्जास्पद वर्तन केले आणि त्याच्या एका सहकाऱ्याला तो प्रकार माहित असल्याचे तक्रारीत नमूद आहे. यामुळे ही बाब त्याने महाविद्यालय प्रशासनाला का सांगितली नाही, असा प्रश्न उपस्थित होतो. तसेच, हा प्रकार त्याने प्रशासनाला सांगितला असेल तर प्रशासनाने गेडामवर कारवाई का केली नाही, असाही संतप्त सवालही उपस्थित झाला आहे.