उद्धव गोडसे, लोकमत न्यूज नेटवर्क, कोल्हापूर: आयसीआयसीआय बँकेच्या राजाराम रोड येथील एटीएम सेंटरवर अज्ञाताने डिपॉझिट मशीनमध्ये ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा केल्या. हा प्रकार गुरुवारी (दि. २८) रात्री दहाच्या सुमारास घडला. बनावट नोटा भरून बँकेची फसवणूक केल्याबद्दल बँकेच्या अधिकारी तृप्ती विजयकुमार कांबुज (वय ३०) यांनी अज्ञाताविरोधात राजारामपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
राजाराम रोडवरील वसंत प्लाझा येथे आयसीआयसीआय बँकेचे एटीएम सेंटर आहे. या सेंटरमध्ये असलेल्या डिपॉझिट मशीनमध्ये कोणीतरी ५०० रुपयांच्या २० बनावट नोटा जमा केल्याचे बँकेच्या अधिका-यांच्या निदर्शनास आले. ज्या खात्यावरून पैसे जमा झाले त्याचा शोध अधिका-यांनी घेतला. मात्र, संबंधित खाते नंबरचा वापर दुस-या व्यक्तीकडूनही होऊ शकतो, त्यामुळे अधिका-यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात शाहूपुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
त्यानुसार पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून, एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून पोलिसांकडून संशयिताचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, बनावट, जीर्ण आणि फाटलेल्या नोटांचा भरणा होऊ नये, यासाठी डिपॉझिट मशीनमध्ये अत्याधुनिक यंत्रणा कार्यरत असते. मात्र, त्यालाही चकवा देऊन बनावट नोटा जमा झाल्याने मशीनच्या कार्यपद्धतीबद्दल शंका निर्माण झाली आहे.